22 November 2017

News Flash

‘सनडान्स’ चित्रपट महोत्सवात ‘ग्रॅण्ड ज्युरी’साठी नामांकन

एड्ससारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण आफ्रिका खंडात सर्वाधिक आहेत. या आजारावर मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 18, 2013 9:19 AM

एड्ससारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण आफ्रिका खंडात सर्वाधिक आहेत. या आजारावर मोठय़ा प्रमाणावर संशोधन सुरू असले तरी काही स्वस्तात उपलब्ध होऊ शकणारी ‘अ‍ॅण्टीरेट्रोव्हायरल’ औषधे पाश्चात्य देशांतील बलाढय़ औषध कंपन्यांनी तयार केली आहेत. परंतु, ही औषधे या कंपन्या आणि पाश्चात्य देशांची सरकारे यांनी १९९० आणि २००० च्या दशकामध्ये आफ्रिकेसह अनेक देशांमधील रुग्णांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी प्रयत्न केले. परिणामी या दुर्धर आजाराच्या लाखो रुग्णांना औषधाविना प्राण गमवावे लागले. याच विषयावर मुंबईस्थित भारतीय-कॅनेडियन वंशाचे दिग्दर्शक डिलन मोहन ग्रे यांनी माहितीपट बनविला आहे. ‘फायर इन द ब्लड’ असे या माहितीपटाचे नाव असून अमेरिकेतील उटाह राज्यात सुरू झालेल्या प्रतिष्ठेच्या ‘सनडान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील माहितीपटांच्या विभागात तो दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तब्बल १२ हजार माहितीपटांच्या प्रवेशिकांमधून ‘फायर इन द ब्लड’चे नामांकन ‘ग्रॅण्ड ज्युरी’ पुरस्कारासाठी करण्यात आले आहे.
डिलन मोहन ग्रे यांचा जागतिक स्तरावरचा हा माहितीपट चार खंडांमध्ये करण्यात आला आहे. भारतात ५ एप्रिल रोजी हा माहितीपट प्रदर्शित होत आहे.
जगभरातील ‘इंडिपेंडण्ट सिनेमा’ या गटातील निर्माते-दिग्दर्शकांचे चित्रपट-माहितीपट सनडान्स महोत्सवात प्राधान्याने निवडले जातात. भारतासह आफ्रिकेमध्ये एड्स आजाराबाबतची सार्वजनिक धोरणे, लोकांची याबाबतची भूमिका यांसारख्या गोष्टींवरही या माहितीपटांतून प्रकाशझोत टाकण्यात आला असून बिल क्लिंटन, डेसमण्ड टूटू आदी मान्यवरांनी या माहितीपटासाठी मदत केली आहे.

First Published on January 18, 2013 9:19 am

Web Title: grand jurry nominated for sundance cinema festival