News Flash

बहुबालिश मस्ती

हिंदूी चित्रपटात ‘मस्ती’, ‘देल्लीबेल्ली’ आणि यांसारख्या काही चित्रपटांद्वारे ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’, ‘सेक्स कॉमेडी’ हा प्रकार

| September 15, 2013 01:06 am

हिंदूी चित्रपटात ‘मस्ती’, ‘देल्लीबेल्ली’ आणि यांसारख्या काही चित्रपटांद्वारे ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’,  ‘सेक्स कॉमेडी’ हा प्रकार आपल्याकडे रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मस्ती’ या चित्रपटाचा सीक्वेलपट असलेला ‘ग्रॅण्ड मस्ती’ आधीच्याच चित्रपटांतील प्रमुख कलावंतांना घेऊन निर्माण केला आहे. खासकरून विशीतल्या तरुण प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून चित्रपटकर्त्यांनी चित्रपट बनविल्यामुळे पाचकट अश्लील विनोदाची पखरण असली तरी चित्रपट पाहताना तो ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ न वाटता ‘बहुबालिश’ ठरतो. अर्थात सेक्सविषयक विनोदांमुळे घटकाभर मनोरंजन करण्यात मर्यादित यशस्वी होतो.
कॉलेज तरुण, तरुण पुरुष सदान्कदा सेक्सविषयक विचार करतात हे गृहीत धरून विशीतील तरुणाईला लक्ष्य ठरवून दिग्दर्शक-निर्मात्यांनी ‘ग्रॅण्ड मस्ती’ची निर्मिती केली आहे. ‘मस्ती’च्या यशामुळे चित्रपटगृहात जातानाच काहीतरी धमाल पाहायला मिळणार, ‘सॉलिड टाइमपास’ होणार अशा अपेक्षेने प्रेक्षक जातो. परंतु प्रेक्षकाच्या अपेक्षा फक्त मर्यादित स्वरूपात पूर्ण होतात.
अमर, प्रेम आणि मीत हे तीन लग्न झालेले मित्र. त्यांच्या बायकांना त्यांच्यावर प्रेम करायला फुरसत नाही. कॉलेजचे दिवस आठवत, केलेली मौजमजा, मस्ती आठवत हे तीन मित्र दिवस कंठत आहेत. अशातच त्यांना कॉलेजकडून विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे निमंत्रण मिळते आणि आतातरी कॉलेजमध्ये केली तशी मस्ती करूया आणि आपल्या रटाळ आयुष्यात थोडी गंमत आणूया या विचाराने ते स्नेहसंमेलनासाठी जातात. त्यांच्या कॉलेजचा प्राचार्य रॉबर्ट हा कॉलेजमधील तरुण-तरुणींना प्रेमकूजन करण्यास विरोध करणारा आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये गेल्यावर अमर, प्रेम, मीत यांचा भ्रमनिरास होतो. मग त्यातून ते स्त्रीसुख घेण्यासाठी, ललनांना आकर्षित करण्यासाठी नाना क्लृप्त्या लढवितात आणि ‘ग्रॅण्ड मस्ती’ करण्याच्या भानगडीत स्वत:च कसे अडकतात यावर चित्रपटाचा भर आहे.
रितेश देशमुखने साकारलेला अमर, आफताबचा प्रेम आणि विवेक  ओबेरॉयने साकारलेला मीत या व्यक्तिरेखा अतिशय भंपक आहेत आणि हेच गृहीतक धरून पटकथेची आखणी करण्यात आली आहे. रॉबर्ट हे कॉमिक पुस्तकांमधील खलनायक असावेत इतकी बेगडी, तकलादू व्यक्तिरेखा आहे. परंतु हॉलीवूडमधील अ‍ॅडल्ट कॉमेडींमध्ये दाखवितात तसेच दाखविणे आपल्या धंद्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे हे जोखूनच चित्रपटकर्ते चित्रपट बनवू इच्छितात. कारण भारतीय वातावरणात अ‍ॅडल्ट कॉमेडी कशी करायची याची कल्पकता आपल्याकडे नाही हे जणू या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने सिद्धच केले आहे. मग अ‍ॅडल्ट कॉमेडी बनवायची असेल तर हॉलीवूड आणि युरोपातील या विषयावरच्या तत्सम चित्रपटांचे अनुकरण करण्याशिवाय पर्याय उरत नाही.
प्रेमच्या बायकोचे नाव तुलसी आहे. परंतु तिला घरकामातील व्यस्ततेमुळे म्हणे प्रेमकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणून प्रेम म्हणतो की, ‘मेरी बिवी का नाम तुलसी है लेकिन मेरे सिवाय वो पुरे आंगन की हो गई है’. असल्या विनोदामुळे क्वचित हशा पिकतो, त्याचबरोबर अ‍ॅडल्ट कॉमेडीसाठी वेगवेगळ्या अवयवांसाठी समाजात रूढ असलेले शब्द वापरून विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न लेखक-दिग्दर्शक करतो. सेक्सविषयक असे विनोद सध्या मोबाइल, एसएमएस, इंटरनेट चॅटिंग याद्वारे मोठय़ा प्रमाणावर केले जात असल्यामुळे आजच्या प्रेक्षकाला त्यात काहीच नावीन्य वाटत नाही. आपल्याला माहीत असलेलेच विनोद पुन्हा पडद्यावर पाहण्यात प्रेक्षकाला रस नसतो. त्यामुळे बाष्कळ विनोदाचा डोस पाजत दिग्दर्शक चित्रपट चालू ठेवतो.
रितेश देशमुख, आफताब शिवदासानी हे विनोदी कलावंत म्हणून प्रस्थापित झाले आहेत. विवेक ओबेरॉय ‘मस्ती’मध्येही होता, परंतु त्याला विनोदी अभिनय करणे जड गेले आहे. रितेश देशमुखचा विनोदाचा टायमिंग सेन्स यामुळे या चित्रपटात त्याची व्यक्तिरेखा चांगली जमून गेली आहे. ‘नटरंग’फेम सोनाली कुलकर्णी या चित्रपटाद्वारे हिंदीत झळकली आहे. परंतु तिच्यासह अन्य पाच स्त्री व्यक्तिरेखा बिनडोक आहेत हेही दिग्दर्शकाने गृहीत धरले आहे. त्यामुळे सहा स्त्री व्यक्तिरेखांना पटकथेत अजिबात वाव देण्यात आलेला नाही.

ग्रॅण्ड मस्ती
निर्माते – अशोक ठकेरिया, इंद्रकुमार
दिग्दर्शक – इंद्रकुमार
लेखक -मिलाप झवेरी, तुषार हिरानंदानी
संगीतकार – आनंद राज आनंद, संजीव दर्शन
छायालेखक – ऋतुराज नारायण
कलावंत – विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, सोनाली कुलकर्णी, ब्रूना अब्दुल्ला, कायनात अरोरा, करिष्मा तन्ना, मंजिरी फडणीस, मरयम झकेरिया, प्रदीप रावत, सुरेश मेनन व अन्य.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:06 am

Web Title: grand masti a childish hindi movie
Next Stories
1 होय, सलमान खान शुद्ध मराठीत बोलला..
2 नेहरू सेंटरचा बहुभाषिक राष्ट्रीय नाटय़ोत्सव
3 प्रेमानंद गज्वी यांची तीन नाटके इंग्रजीत
Just Now!
X