महापालिका व व्हीएमव्ही, जेजेपी व जेएमटी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात ग्रंथ व साहित्य महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  
हा संपूर्ण महोत्सव नि:शुल्क आहे. विद्यार्थ्यांसह नवोदित लेखकांचे कौशल्य व कृतीशिलतेला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. सोमवारी ११ फेब्रुवारीला सकाळी वर्धमाननगरातील महाविद्यालय परिसरातून ग्रंथ दिंडी निघाली. त्यात आकर्षक रथ होता. परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये ही दिंडी गेली. महोत्सवाची माहिती देऊन विद्यार्थी व शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता होईल. महापौर अनिल सोले, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ याप्रसंगी उपस्थित राहतील. कवी पार्वती देशमुख तसेच साहित्यिकांचा या महोत्सवात सत्कार केला जाईल. कुंचला व व्यासपीठ हा आगळावेगळा कार्यक्रम महोत्सवात होईल. विजयानंद बिस्वाल हे कविता सादर करतील तर त्याचवेळी विकास खुराणा त्यांच्या कुंचल्याने चित्र साकारतील.
आंतरमहाविद्यालय चित्रकला, वादविवाद स्पर्धा, लावणी या महोत्सवात होणार आहे. ‘अर्थशास्त्र व मानवी वर्तवणूक’ विषयावर चर्चासत्र होणार असून नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. विनायक गोविलकर, डॉ. विनायक देशपांडे, प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस सहभागी होतील. ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा होणार असून हिस्लॉप महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अनिल मॅथ्यू व कवयित्री आशा पांडे सहभागी होतील. ‘विदेशी व खासगी विद्यापीठांचा शिरकाव’ विषयावरही चर्चासत्र होणार असून कुलगुरू डॉ. राजन वेळूकर, इग्नूचे प्रादेशिक संचालक डॉ. शिवस्वरूप, माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील प्रमुख वक्ते आहेत. बहुभाषीय कविसंमेलन होणार असून प्रा. यू. जी. सरोदय, दीपक रंगारी, सरोज व्यास, सुनीतकुमार आतिश, दीप्ती शुक्ला, प्रो. भावेश भूपतानी, रणजितकुमार आचार्य, सुकुमार चौधरी, ज्योतिर्मयी साहू, डॉ. सुपंथो भट्टाचार्य, डॉ. प्रतीक बॅनर्जी, डॉ. प्रवीण जोशी सहभागी होतील.
‘अपराध से न्याय तक’ विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कोलकाता उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्या. जयनारायण पटेल राहणार असून आमदार देवेंद्र फडणवीस, सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, पत्रकार नितीन केळकर त्यात सहभाग घेतील. ‘विज्ञान चमत्कार’ या विषयावर श्याम निकोसे व्हिडिओ शो सादर करतील. नागपूर गुजराती मंडळाचे सरचिटणीस अ‍ॅड. नरेंद्र झा, ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत समारोप होईल. या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. चांदेकर यांनी केले.