अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीने द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र शासनाने द्राक्ष उत्पादकांना सरसकट कर्जमाफी द्यावी, याकरिता निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी बुधवारी मूक मोर्चा काढला. आपल्या मागणीचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी नायब तहसीलदारांना दिले.
निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक या वर्षी अवकाळी पावसाने मेटाकुटीस आले आहेत. गोडय़ाबार छाटणीपासून सुमारे चार-पाच वेळा अवकाळी पाऊस झाला. प्रत्येक अवस्थेत गारपीट, पाऊस, थंडी या नैसर्गिक आपत्तीने डावणी, डकुज, भुरी, मणीगळ या रोगांचा मारा झाला. वाढत्या उत्पादन खर्चामुळे द्राक्ष उत्पादकांना कर्ज, उधार-उसनवाऱ्या फेडणे शक्य नाही. द्राक्ष माल परिपक्व स्थितीत असताना शनिवार ते सोमवापर्यंत झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील बागायतदारांची द्राक्ष शेती उद्ध्वस्त झाली आहे. अशा स्थितीत उत्पादकांना उभे करण्यासाठी शासनाने कर्जमाफी करण्याचा निर्णय घ्यावा आणि बँकांची कर्जवसुली थांबवावी अशी मागणी उत्पादकांनी मोर्चाद्वारे केली.
याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार सोनवणे यांना देण्यात आले. या वेळी द्राक्ष उत्पादक संघर्ष समितीचे नेते छोटुकाका पानगव्हाणे, निफाडचे सरपंच अनिल कुंदे, उपसरपंच दिलीप कापसे आदींसह शेकडो उत्पादक मोर्चात सहभागी झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निफाडचे निरीक्षक दिलीप निगोट, लासलगावचे निरीक्षक आर. बी. सानपे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 5, 2015 8:20 am