नागपुरात पुढील महिन्यात आयोजित ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ ’मध्ये प्रत्यक्ष उद्योगपतींनी सहभागी व्हावे, असा आग्रह मुख्यमंत्र्यांजवळ धरण्यात आला असल्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ च्या पूर्वतयारीसाठी विदर्भातील लोकप्रतिनिधींचे स्नेहमीलन हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर मोघे यांनी पत्रकारांना अ‍ॅडव्हांटेजच्या आयोजनाच्या स्वरुपाविषयी माहिती दिली. खासदार विलास मुत्तेमवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, अर्थ व उर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे याप्रसंगी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने व उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या सहकार्याने २५ व २६ फेब्रुवारी रोजी ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ  आयोजित करण्यात आले आहे. विदर्भाचा सर्वागीण औद्योगिक विकास व्हावा, अशी प्रत्येकच पक्षाच्या लोकप्रतिनिधींची भावना आहे. यासाठी संघटित प्रयत्न झाल्यास यश येते, याची खात्री आहे. म्हणूनच औद्योगिक विकासाचा उहापोह व्हावा व विकासाच्या कामांना गती मिळावी, यासाठी आज लोकप्रतिनिधींचे स्नेहमीलन आयोजित केल्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले. आजच्या बैठकीला विदर्भातील फक्त २८ लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली.
प्रारंभी लोकप्रतिनिधींना ‘विदर्भ अ‍ॅडव्हांटेज’ बद्दल माहिती देण्यात आली. वस्त्रोद्योग, ऑटो मायनिंग, लॉजिस्टिक, कृषी व अन्नप्रक्रिया, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती या प्रमुख विषयांवर एकत्रित व गटवार, अंतर्गत व खुली चर्चा होईल. समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून अध्यक्षस्थानी खासदार विजय दर्डा तर खासदार अजय संचेती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन हे संयुक्त आयोजक आहेत. वस्त्रोद्योगावरील विशेष चर्चेत रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, वेल्सपन समूहाचे अध्यक्ष बी. के. गोयनका हे प्रामुख्याने उपस्थित राहतील. ऑटो मायनिंग चर्चेत भारत फोर्जचे संजीव जोगळेकर, धीरुभाई अंबानी समूहाचे सतीश सेठ सहभागी होतील. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगावरील चर्चेत फ्युचर समूहाचे किशोर बियानी, कारगिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सिराज चौधरी, विदर्भात पर्यटन उद्योगाच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी दक्षिण आफ्रिका टुरिझमचे हॅन्ली स्लॅबर, कॉक्स अ‍ॅड किंग्जच्या उर्शिला केळकर सहभागी होतील. माहिती तंत्रज्ञानव साह्य़भुत सेवा विषयावरील चर्चेत महिंद्र लिमिटेडचे चंद्रप्रकाश गुरुनानी, टाटा कन्सलटन्सीचे के. एस. रामादोराई, औषध निर्मिती व रसायन विषयावर व्हीपी फायनान्सचे सुनील मखारिया सहभागी होतील. प्रत्यक्ष उद्योगपतींनी यात सहभागी व्हावे, असा आग्रह मुख्यमंत्र्यांजवळ धरण्यात आला असल्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.  
विदर्भाची सक्षमता उद्योजकांसमोर मांडणे, ज्या आधारे ते येथे उद्योग सुरू करू शकतील, शक्य असल्यास बीओटी तत्वावर करार करणे हा ‘विदर्भ अ‍ॅडव्हांटेज’च्या प्रमुख उद्देश असल्याचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी सांगितले. आजच्या स्नेहमीलनात लोकप्रतिनिधींनी त्यांचे मत व्यक्त केले. कापूस हे मुख्य पीक तसेच कोळसा मुख्य खनिज असल्याने त्याच्याशी संबंधित उद्योग आले पाहिजेत, असा लोकप्रतिनिधींचा आग्रह होता. ट्रांझिट हबजवळच जागा देण्याचा उद्योजकांचा आग्रह असतो. जल आणि आकाश वाहतूक मुंबईत आहे, हे त्यामागील कारण आहे. त्यामुळे विदर्भात उद्योग आकर्षित होण्यासाठी कर सवलत, वीज सवलती जास्त द्यावा लागतील, दीर्घकाळासाठी द्याव्या लागतील, विदर्भात सात अभयारण्ये आणि तीन व्याघ्र प्रकल्प असल्याने पर्यटन व त्यातून मोठी रोजगार निर्मिती होईल, याकडे अनेक लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधल्याचे मुत्तेमवार यांनी सांगितले.
कर सवलत तसेच वीज सवलत आदी बाबी याआधीच्या उद्योग धोरणात होत्या आणि नव्या धोरणातही आहेत. या सवलती फक्त विदर्भ, खान्देश व मराठवाडय़ातच दिल्या जाव्यात, असा आग्रह मुख्यमंत्र्यांजवळ धरला जाईल, असे अर्थ व उर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक म्हणाले.
 मागासभागाचा विकास झाला पाहिजे, अशी केवळ काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर   सर्वाचीच   इच्छा असल्याचे तसेच मिहानसाठी राज्य शासनाने ४४० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने शासन   त्यादृष्टीने    सकारात्मक असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री   अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.