वसईतल्या जुन्या परंपरांना उजाळा देण्यासाठी सामवेदी ख्रिस्ती (कुपारी) संस्कृती मंडळाने नंदाखाल येथे आयोजित केलेल्या कुपारी महोत्सवाला जोरदार प्रतिसाद लाभला. या निमित्ताने या महोत्सवाला हजारो सामवेदी ख्रिस्ती स्त्री-पुरुष व आबाल वृद्धांनी भेट देऊन आनंद लुटला. जुन्या वसईची संस्मरणीय ओळख पटविणारी चित्रे, पारंपरिक वेषभूषा, खाद्यपदार्थाची दालने, गावातील रहाटगाडगी, जुन्या वस्तूंचे प्रदर्शन हे येथील प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते.
वसई तालुक्यातील १२ आगरांत हा समाज शेकडो वर्षे आपल्या परंपरांचे जतन करीत आहे. शहरीकरणाच्या व पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याच्या भरात जुन्या वैभवशाली वारशाचे आम्ही जतन केले आहे हे या महोत्सवाने दाखवून दिले. कुपारी समाजाची बोलीभाषा, वेषभूषा, अलंकार लेऊन स्त्री-पुरुषांनी जणू धूम निर्माण केली. दुपारी ३ ते १० वेळात हा महोत्सव रंगला.
सुरुवातीला दुपारी संस्कृती दिंडी काढण्यात आली. दिंडीत बैलगाडी, लाल पारंपरिक लुगडे नेसलेल्या स्त्रिया, धोतर, काळी-लाल टोपी घातलेले पुरुष पाहिले आणि जुना जमाना आठवला. रात्री पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची लज्जत द्विगुणीत झाली. यावेळी प्रत्येकजण आपल्या बोलीभाषेत बोलत होता. ‘पाशीहार’ या विशेषांकाचे व कुपारी दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.