चांदा क्लब ग्राऊंडवर सुरू असलेल्या महिला बचतगटनिर्मित वस्तू विक्री प्रदर्शनाला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून काष्ठशिल्प व खाद्यपदार्थाचे स्टॉल नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसहायता बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंची जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन १८ ते २२ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनात बचतगटामार्फत निर्मित विविध वस्तूंचे आकर्षक व मनमोहक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे बचतगटांनी स्वत: निर्माण केलेल्या या सर्व वस्तू आहेत. महिला सबलीकरण करण्यासाठी शासनाने बचतगटाच्या माध्यमातून महत्त्वाचे पाऊल उचलले असून त्याचाच एक भाग म्हणून हे प्रदर्शन आयोजित केले आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘कुपोषणमुक्त सकस आहार’ या स्टॉलला महिलांनी मोठय़ा प्रमाणात भेट दिली. आयुर्वेदिक औषधे, वनौषधे, वॉशिंग पावडर, मिरची पावडर, चकली, लाखोळी, वडे, हळदीकुंकू या उत्पादनांचीही महिलांनी प्रशंसा केली. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण काष्टशिल्प व खाद्यान्नाचे स्टॉल आहेत. काष्ठशिल्पाचे दोन स्टॉल लावण्यात आले असून हाताने तयार केलेल्या शोभिवंत वस्तू या ठिकाणी विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. गृह सजावटीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू व भित्तीचित्र या स्टॉलवर प्रामुख्याने आढळतात. त्यामुळेच हे स्टॉल्स नागरिकांचे प्रमुख आकर्षण बनले आहेत. सध्या हिवाळा सुरू असून तयार गरम कपडय़ांना पसंती दर्शविली जाते. मात्र, या प्रदर्शनात बचतगटांनी तयार केलेल्या घोंगडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. त्या अतिशय सुरेख असून त्यालाही पाहण्यासाठी नागरिक पसंती दर्शवत आहेत.
यात्रा, प्रदर्शन व मेळावा अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांना मुख्य आकर्षण असते ते खाद्यान्नाच्या स्टॉल्सचे. महिला बचतगट प्रदर्शनातही बचतगटांनी अतिशय रुचकर व चवदार पदार्थाचे स्टॉल्स उभारले असून माठावर तयार केलेली लांब रोटी या ठिकाणचे वैशिष्टय़ आहेत. येणारा प्रत्येक नागरिक या स्टॉलला केवळ भेटच देत नाही, तर या लांब रोटीची चवही चाखताना दिसतो. यासोबतच नक्षीकाम, मातीची भांडी, चकली, मुरमुरे लाडू, चटपटीत नाश्ता, अगरबत्ती, वातनाशक तेल, सहद, खाजेवरील मलम, अडुळसा, दुधी, भोपळा, कोहळा, सूप, टोपली व इतर सौंदर्य प्रसाधने या प्रदर्शनात विक्रीस ठेवली असून या स्टॉल्सलाही महिला पसंती दर्शवत आहेत. या प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी आहे.