07 August 2020

News Flash

‘डोंगर हिरवागार’ करण्यासाठी नाशिककरांचा प्रतिसाद

एरवी वेगवेगळ्या कारणास्तव प्रसिद्ध असलेला शिवाजीनगरलगतचा फाशीचा डोंगर शुक्रवारी तान्हुल्यांपासून ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, विद्यार्थी यांच्या सक्रिय

| June 6, 2015 07:00 am

एरवी वेगवेगळ्या कारणास्तव प्रसिद्ध असलेला शिवाजीनगरलगतचा फाशीचा डोंगर शुक्रवारी तान्हुल्यांपासून ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागाने नटला. आंबा, वड, पिंपळ, मोह यासह आदी रोपटय़ांनी उत्स्फूर्तपणे लागवड करत पर्यावरण संवर्धनाचा मूलमंत्र दिला. निमित्त होते, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वन महोत्सवाचे. वन विभाग आणि सामाजिक संस्थांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल दहा हजार रोपांची लागवड एकाच दिवशी करण्यात आली.
येथील देवराई अर्थात फाशीचा डोंगर परिसरात सकाळी नऊ वाजता वन महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले. या महोत्सवात नाशिककरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आयोजकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश नागरिकांनी आपल्या सोबत पाच लिटर पाणी आणले होते. ज्यांना ते शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी या ठिकाणी खास व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय काही व्यावसायिकांनी झाडांना पाणी देण्यासाठी वाहिनीची व्यवस्था केली होती. वन विभाग आणि आपलं पर्यावरण संस्थेने वृक्षारोपण तांत्रिकदृष्टय़ा योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाने १० हजार खड्डे खोदून त्यात शेणखत आणि रासायनिक खत विशिष्ट प्रमाणात आणून ठेवले. यासाठी ३०० एकर जागेत ४२ विभाग पाडत प्रत्येक विभागात साधारणत: १००-५०० झाडे ठेवण्यात आली. डोंगराच्या पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत ठेवलेल्या या झाडांना क्रमांक देण्यात आले. त्या त्या विभागासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी वड, पिंपळ, आंबा, बकुळ, मोह, पळस, भोकर, पायर, खडकपायर, शिवण, भोर, विलासंती, चिंच, पापडा यासह विविध प्रजातींचे झाडे उपलब्ध करून देण्यात आली. पुणेकरांकडून महोत्सवासाठी नऊ हजार रोपे, नाशिककरांच्या वर्गणीतून पाच हजार रोपे खरेदी करण्यात आली. काही रोपे सामाजिक वनीकरण विभागाने उपलब्ध केली.
सकाळी आठ वाजेपासून नाशिककरांनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. संत तुकारामांनी दिलेला ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे.’चा संदेश बहुतेकांनी प्रत्यक्षात आणला. कुटुंबातील तान्हुल्यांपासून आजी-आजोबांपर्यंत साऱ्यांनी या उपक्रमात हिरिरीने सहभाग नोंदविला. रोपांची लागवड करताना अनेकांनी त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेतली. काहींनी मंत्राच्या जयघोषात वृक्षारोपण केले. स्थानिकांचा प्रतिसाद पाहता आयोजकांनी या उपक्रमात सातत्य राहावे यासाठी प्रत्येकाचा तपशील संकलित करीत सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
वन महोत्सवाच्या ठिकाणी पर्यावरण जत्रा भरवण्यात आली. या जत्रेत मधुमक्षिकापालन, घरगुती कचऱ्यापासून खतनिर्मिती, घरगुती शेती, गच्चीवरील बाग, पक्ष्यांची घरटी आदी पर्यावरणाशी संबंधित स्टॉल्सला चांगला प्रतिसाद मिळाला. काही सामाजिक संस्थांकडून प्रदूषण मुक्तीचे संदेश देणारे फलक लावण्यात आले. काहींनी प्लास्टिकमुक्त नाशिकसाठी कापडी पिशव्यांचे वितरण केले. महोत्सवात येतांना नाशिककरांची गैरसोय होऊ नये यासाठी सातपूरच्या अशोकनगर तसेच गंगापूर गावापासून बेनिवाल ट्रॅव्हलकडून मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली. शहर बस वाहतुकीच्या वतीने खास सहकार्य करण्यात आले. महोत्सवात काही परदेशी नागरिकांसह पुण्यातील पर्यावरणप्रेमी, शहरातील खासगी शैक्षणिक संस्था, शाळा-महाविद्यालये, कामगार, शेतकरी, छोटे विक्रेते, नोकरदार, युनिक ग्रुप, लोकराज प्रतिष्ठान, वाणी मंडळ, आवास, जीवन उत्सव, निर्मल ग्राम केंद्र, लोकाधार, मराठी विज्ञान परिषद, रोटरी, जेसीआय यासह अन्य संघटनांनी सहभाग नोंदविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2015 7:00 am

Web Title: green mountains
टॅग Nashik
Next Stories
1 अ.भा. मराठी नाटय़ परिषदेच्या पुरस्कारांवर नाशिकचा ठसा
2 लैंगिक अत्याचारांविषयी कारखान्यांमध्ये सर्वेक्षण
3 ढगाळ हवामानामुळे तापमानात घट; नागरिकांना दिलासा
Just Now!
X