जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी कुठलाही ठोस कार्यक्रम हाती नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ग्रीन प्लॅनेट या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेला ‘प्लास्टिकमुक्त चंद्रपूर शहर व जिल्हा’ हा ५ जूनला पर्यावरण दिनानिमित्त आयोजित उपक्रम हायजॅक केला आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम रविवार, १५ जूनला होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्क्रीय अधिकाऱ्यांमुळे २००८ पासून हा जिल्हा प्रदूषणात देशात चौथ्या क्रमांकावर आहे. प्रदूषणापासून या जिल्ह्य़ाची मुक्ती व्हावी, असे या अधिकाऱ्यांनाही वाटत नाही. केवळ कागदावर अॅक्शन प्लॅन तयार करायचा आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच करायची नाही, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम आहे. त्याला स्थानिक जिल्हा प्रशासनाचीही साथ आहे. त्यामुळे वर्षांतून एकदा म्हणजे ५ जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करायचे, भाषणे झोडायची, बेंबीच्या देठापासून प्रदूषणमुक्त चंद्रपूर जिल्ह्य़ाची खोटी आश्वासने द्यायची, अॅक्शन प्लान, नीरीचे शास्त्रज्ञ आणखी काय काय बरळायचे, असा हा उपक्रम आहे. यासाठी शासन निधी देते म्हणून दरवर्षी हा उपक्रम साजरा केला जातो, परंतु यावर्षी तर कमालच झाली.  
 जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी या मंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे कुठलाही ठोस कार्यक्रम नव्हता. त्यामुळे या मंडळाने ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केलाच नाही. याच दरम्यान ग्रीन प्लॅनेट सोसायटीने ५ जूनला ‘प्लास्टिकमुक्त चंद्रपूर शहर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यासाठी शहरातील चौकाचौकात पोस्टर्स, बॅनर्स व फ्लेक्स लावले. प्रदूषण मुक्तीसाठी प्लास्टिक निर्मूलन करण्याचा संदेश ग्रीन प्लॅनेटने दिला. ग्रीन प्लॅनेटच्या उपक्रमाला शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्याची नेमकी बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी हेरली. याच दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी वेकोलिच्या ओव्हरबर्डन संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळ, वेकोलि अधिकारी व पर्यावरणवाद्यांची बैठक बोलावली. यात ग्रीन प्लॅनेटच्या प्लास्टिकमुक्त शहर उपक्रमाचे कौतूक झाले. त्याचवेळी जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रीन प्लॅनेटचा हा उपक्रम हायजॅक करण्याची योजना तयार केली.
त्यानुसार ५ जूनला आयोजिन ग्रीन प्लॅनेटचा हा कार्यक्रम माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे कारण समोर करून रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे, तोपर्यंत ग्रीन प्लॅनेटने या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांचे वितरणही केलेले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून हा कार्यक्रम रद्द करून आता १५ जूनला ‘प्लास्टिकमुक्त चंद्रपूर शहर व जिल्हा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एका स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेला कार्यक्रम प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा पध्दतीने हायजॅक केला. विशेष म्हणजे, आता या कार्यक्रमावर होणारा सर्व खर्च प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार आहे. या कार्यक्रमाला शासकीय रंग देण्यात आला असून पर्यावरणमंत्री संजय देवतळेंपासून तर सर्वपक्षीय आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. या उपक्रमात २० संस्थांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी एकाही कार्यक्रमाचे आयोजन न करू शकणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आता मात्र कार्यक्रम हायजॅक केल्यानंतर आम्हीच हा उपक्रम राबवित असल्याचे समोर करून दाखवित आहेत.