राज्यातील सहाव्या तर विदर्भातील पाचव्या व्याघ्र प्रकल्पाला नुकताच ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारतर्फे येत्या काही दिवसातच निघणार आहे. बोर आणि नवीन बोर अभयारण्याचे क्षेत्र मिळून नवीन व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे त्यासंबंधीची अधिसूचना काढण्याची कार्यवाही सुरू आहे.
तत्कालीन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नागपूर कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवेगाव-नागझिरा व बोर या दोन व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानुसार नवेगाव-नागझिरा हा व्याघ्र प्रकल्प काही दिवसांपूर्वीच घोषित झाला. बोर आणि नवीन बोर या दोन्ही अभयारण्याचे मिळून १३८.११ चौरस किलोमीटर क्षेत्राला व्याघ्रप्रकल्प म्हणून मान्यता मिळण्याच्यादृष्टीने काम सुरू होते. या मार्गातील अडथळा आता दूर झाला आहे. या अभयारण्याचे क्षेत्र कमी असल्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळण्यासंदर्भात अनेक अडचणी होत्या. केवळ ६२ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळणे कठीण होते. त्यामुळे वाघाच्या संरक्षणासाठी नवीन बोर अभयारण्याची घोषणा करण्यात आली. बोर व नवीन बोर अभयारण्यालगतचे १६.३१ चौरस किलोमीटर वनक्षेत्र नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्य या नावाने सरकारने अधिसूचनेद्वारे ३ मे रोजी घोषित केले. त्यामुळे बोर व नवीन बोर विस्तारित अभयारण्याचे एकूण क्षेत्र १३८.११ चौरस किलोमीटर झाले आहे. यामुळे वन्यजीव संरक्षण व संवर्धनात महत्त्वाचे योगदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार नागझिरा-नवेगाव व बोर या दोन्ही व्याघ्रप्रकल्पाला आता बफर क्षेत्र जाहीर करावे लागणार आहे. त्यासाठी एक समिती तयार करण्यात येणार असून, त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बोर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यासोबतच, जळगाव जिल्ह्यातील वाघाचे अस्तित्त्व असलेले एकमात्र वडोदा वनपरिक्षेत्रातील मुक्ताई भवानी क्षेत्राला शासन अधिसूचना ३ मे २०१४ नुसार मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे वाघाचे संरक्षण व संवर्धनाकरिता महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.