प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडी उभारणीच्या संपूर्ण स्ट्रक्चरमधील केवळ एका ‘स्क्रू’ची जाडी वाढवण्याची सूचना झाली आणि प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडीच्या दर्जाबद्दल सदस्यांच्या मनात निर्माण झालेला संशय दूर झाला, लगेच जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठेकेदार कंपनीस या अंगणवाडय़ा उभारणीस हिरवा कंदील देऊन टाकलाही. गुणवत्तेच्या कोणत्याही तांत्रिक सल्ल्याची त्यासाठी समितीला आवश्यकता वाटली नाही.
गावोगावी बंद पाडलेली प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांची कामे आता मार्गी लागतील. तब्बल २१ कोटी रुपये खर्चून जिल्हय़ात ४९८ प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ा उभारल्या जाणार आहेत. त्यातील पूर्वीच ४० उभारण्यात आल्या आहेत, तर १७०ची कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र काही विशेषत: काँग्रेस सदस्यांच्या मनात या अंगणवाडय़ांच्या संपूर्ण स्ट्रक्चरच्या दर्जाबद्दल संशय निर्माण झाला. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी उपस्थित केलेल्या दर्जाबद्दलच्या तक्रारीस इतरही काही काँग्रेसच्या सदस्यांनी पाठिंबा दिला होता.
त्याची शहनिशा करण्यासाठी २० जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत लंघे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती कैलास वाकचौरे (बांधकाम) व हर्षदा काकडे (महिला व बालकल्याण), हराळ, सुभाष पाटील, राजेंद्र फाळके, बाजीराव गवारे, राजेंद्र फाळके व शारदा भिंगारदिवे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीसमवेत सदस्य मांढरे,  गुंजाळ व सुनील गडाख यांनी राहुरी व संगमनेर तालुक्यातील काही प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांची पाहणी केली. ठेकेदार कंपनीच्या नाशिकमधील कारखान्याची पाहणी केली. तेथे कंपनीचे कार्यालय व कर्मचा-यांसाठी उभारलेल्या खोल्यांची दि. २८ रोजी पाहणी केली. त्यानंतर समितीची सभा आज झाली, त्यात ठेकेदारास जमिनीत स्ट्रक्चरच्या रोवल्या जाणाऱ्या एका ७५ मिमीच्या स्क्रूऐवजी १०० मिमीचा स्क्रू वापरण्याची सूचना करण्यात आली. प्री-फॅब्रिकेटेडसाठी वापरले जाणारे शीट, लोखंडी अँगल्स, वर टाकले जाणारे पत्रे याच्या दर्जाबद्दल पूर्वीच्या स्थायी व सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारींवर कोणतीही सूचना करण्यात आलेली नाही.
आता या अंगणवाडय़ा तातडीने उभारल्या जातील. उपलब्ध २१ कोटीपैकी १६ कोटी सन २०१२-१३ मध्ये मिळालेले असल्याने ते मार्चपूर्वी खर्च करण्याचे बंधन होते. त्याचाही विचार समितीने प्रामुख्याने केल्याचे लंघे व वाकचौरे यांनी पत्रकारांना सांगितले.
 सदस्यांचे शंकानिरसन
प्री-फॅब्रिकेटेड अंगणवाडय़ांच्या दर्जाबद्दल प्रामुख्याने प्रथम संशय व्यक्त करणारे सभापती काकडे व सदस्य हराळ हे दोघे होते. सर्वसाधारण सभेत तर हराळ यांनी ‘लहान मुलांच्या जीविताशी खेळू नका’ असा इशारा देणारे आवेशपूर्ण भाषण ठोकले होते. त्यांनाही केवळ एका स्क्रूची जाडी वाढवण्यातून अंगणवाडी योग्य दर्जाची होणार असल्याचे पटले. ठेकेदार कंपनीच्या नाशिक येथील कारखान्यास भेट देऊन आल्यावर समितीच्या सर्वच सदस्यांच्या शंकांचे निरसन झाले. थर्माकोलचा वापर करून तयार केलेले शीट सर्वच ठिकाणी वापरले गेले आहेत, असे लंघे यांनी सांगितले.