डिसेंबरच्या शेवटचा आठवडा, तशात चौथा शनिवार व मंगळवारी नाताळाची सुट्टी आल्याने केवळ सोमवारची रजा टाकली की थेट चार दिवसांची सुट्टी असे योग जुळून आल्याने मुंबईकरांनी ‘इयर एन्ड’च्या विसाव्यासाठी आसपासच्या निसर्गरम्य स्थळांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे शनिवार २२ डिसेंबर ते मंगळवार २५ डिसेंबपर्यंत आणि २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ची अर्थात ‘एमटीडीसी’ची कोकणातील निळय़ाशार समुद्रकिनाऱ्यांवरची आणि महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान अशी सर्व हॉटेल ‘हाऊसफुल्ल’ झाली आहेत.
मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती अलिबाग, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, तारकर्ली या अथांग समुद्रकाठी वसलेल्या निसर्गसंपन्न पर्यटनस्थळांना दिली आहे. त्याचबरोबर थंडीचा मोसम असूनही धुक्यात हरवलेल्या रानवाटांची मौज लुटण्यासाठी माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी अशी ‘हिल स्टेशन’वरच्या ‘एमटीडीसी’च्या हॉटेलांचे बुकिंगही १०० टक्के झाले आहे. ‘इयर एन्ड’च्या मौजमजेसाठी २२ डिसेंबर ते २५ डिसेंबर आणि २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर अशारितीने दोन वेगवेगळय़ा टप्प्यांत लोक बाहेर पडले आहेत. या पर्यटनाच्या हंगामात ‘एमटीडीसी’च्या हॉटेल्सचे दर नेहमीच्या दरापेक्षा सुमारे २० ते २५ टक्क्यांनी महाग असतात. तरीही २६ डिसेंबर आणि काही ठिकाणी २७ डिसेंबरचा अपवाद वगळला तर २२ डिसेंबर ते २५ डिसेंबर व २८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘एमटीडीसी’ची हॉटेल्स, रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले आहेत.