हिरवेगार शहर अशी ओळख असलेल्या नागपूरच्या हिरवाईत आता पुन्हा एकदा भर पडणार आहे. विशेष म्हणजे नागपूरकरांच्या स्वप्नातील प्रकल्प असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची वाट या हिरवळीतून जाणार आहे. 

गेल्या तीन-चार वर्षांत गोरेवाडय़ाची वाटचाल घोडदौडीने सुरूअसतानाच नागपूर महानगरपालिकेने या वाटेत आणखी हिरवळ रोवण्याचे ठरवले आहे. गोरेवाडालगतच्याच ५० एकर परिसरात बांबूचे बन उभारण्यावर महापालिकेने शिक्कामोर्तब केले. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे बरेचसे काम आता पूर्ण झाले आहे. बचाव केंद्र, संरक्षण भिंत, मचाण आदी अनेक बाबी पूर्णत्वास आलेल्या असताना अलीकडेच वनमंत्र्यांनी पाच वषार्ंत हे प्राणिसंग्रहालय पर्यटकांच्या सेवेत उभे राहील अशी ग्वाही दिली. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आता महापालिकेने या प्राणिसंग्रहालयाकडे जाणाऱ्या वाटेवर बांबूची हिरवळ पसरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी मानकापूर चौक ते काटोल मार्ग चौकातील रिंग रोडच्या पट्टय़ावर सुमारे ५० एकर जागेवर बांबू लावण्यात येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामध्ये कार्यक्रमासाठी लॉन आणि काही बांधकाम व्यावसायिकांद्वारे गृहनिर्माण योजनाही सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र, महापालिकेच्या लक्षात वेळीच ही बाब आली आणि त्यांनी होणारे हे अतिक्रमण परतवून लावले. महापौर प्रवीण दटके यांनी या ठिकाणी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून सर्व अतिक्रमण काढले. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयालगतच्या जमिनीवर हे अतिक्रमण होते. या अतिक्रमणाचा पूर्णपणे सफाया करण्यात महापालिका यशस्वी ठरल्यानंतर या जमिनीवर आता बांबूची हिरवळ उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
महानगरपालिका हा प्रकल्प आता वनखात्याच्या सहकार्याने राबवणार आहे. येत्या काही वर्षांत शहरातील या मार्गावर बांबूची हिरवळ नागरिकांना पाहायला मिळणार आहे. तांत्रिक आणि वैज्ञानिकदृष्टय़ा बांबूची लागवड कशी करायची याचे पूर्ण मार्गदर्शन वनखात्याकडून महापालिकेला करण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पासंदर्भातली आर्थिक तरतूद आणि संबंधित आराखडा लवकर तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महापौर प्रवीण दटके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.