नवी मुंबईतील शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांना लीजवर देण्यात आलेली जवळची मैदाने ही त्या शैक्षणिक संस्थांची मालमत्ता नसून शाळा-कॉलेज बंद झाल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांच्या मुलांना खेळण्यासाठी देण्यात यावीत, असे निर्देश सिडको प्रशासनाने दिलेले आहेत. ऐरोली सेक्टर दहा येथील डीएव्ही विद्यालयाने अशा प्रकारे आपल्या शाळेजवळील मैदान संस्थेला कायमस्वरूपी मागितले होते. त्याला सिडकोने नकार दिला आहे.
सिडकोने नवी मुंबईत अनेक शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात भूखंड दिलेले आहेत. या संस्थांच्या मागणीनुसार जवळपास असलेला मोकळ्या मैदानाचा भूखंड या संस्थेतील विद्यार्थ्यांना खेळासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सिडकोने काही अटी व शर्तीना अधीन राहून दिलेले हे मैदानाचे भूखंड ही आपलीच मालमत्ता असल्याच्या तोऱ्यात काही संस्था वागत असून ते आजूबाजूच्या रहिवाशांना मैदानावर मज्जाव करीत असल्याचे दिसून आले आहे तर सीबीएसई बोर्ड असलेल्या डीएव्ही, दिल्ली पब्लिक स्कूलसारख्या बडय़ा शाळा अशा भूखंडांची देखभाल आणि दुरुस्ती करीत असल्याने ती मालमत्ता आपलीच झाली अशा अविर्भावात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकवस्तीतील तरुण खेळाडूंचे शाळा संचालकांबरोबर खटके उडत असल्याचे दिसून येते. त्यात काही शाळा, कॉलेजना वाढीव एफएसआय सरकारने दिल्याने ही मोकळी मैदाने या शाळांनी गिळंकृत केल्याचे दिसून येते.
त्यावर सिडकोने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. पण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवरून शाळा, कॉलेज, रुग्णालय यांना वठणीवर आणणाऱ्या सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही राधा यांनी शाळेचे मैदान हडप करू इच्छिणाऱ्या शैक्षणिक संस्थांना चाप लावला असून त्याचा पहिला फटका ऐरोलीतील डीएव्हीला बसला आहे.