News Flash

मैदान सुने झाले..

खेळ आणि खेळाडूंवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करणारे एक अजातशत्रू, उत्कृष्ट संघटक, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व मेजर दिनुभाऊ कुलकर्णी यांच्या निधनामुळे लोप पावले.

| January 22, 2013 02:46 am

खेळ आणि खेळाडूंवर आपल्या मुलांप्रमाणे प्रेम करणारे एक अजातशत्रू, उत्कृष्ट संघटक, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व मेजर दिनुभाऊ कुलकर्णी यांच्या निधनामुळे लोप पावले. सकाळी उठल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत कायम मैदानावरच दिसणाऱ्या दिनुभाऊंचा ज्येष्ठत्वाच्या वयातही मैदानावरचा वावर उत्साहाचाच असायचा. शहरातील कोणत्याही मैदानावर कोणत्याही खेळाच्या स्पर्धा सुरू असो, तेथे त्यांची उपस्थिती हमखास असायची ती खेळाडू आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही मार्गदर्शक अशीच. दोनच दिवसांपूर्वी नगरच्या क्रिकेट रसिकांची जिव्हाळ्याची क्रॉम्प्टन करंडक स्पर्धा वाडिया पार्कवर सुरु झाली, तेव्हाही त्यांची तेथे हमखास अशी भेट झाली आणि पंधरा दिवसांपूर्वी समर्थ शाळेचा खो-खो संघ राज्य स्पर्धेसाठी गुहागरला जाण्यापूर्वी शहराच्या एका टोकाला असलेल्या एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर जाऊन खेळाडूंना त्यांनी कोणी कसे खेळले पाहिजे याचे तंत्र सांगत कोणाची कशी तयारी झाली याची माहिती घेतली. खेळ कोणताही असो ते त्या खेळाडूची आपुलकीने चौकशी करत. सर्वच खेळांवर असा भरभरुन प्रेम करणारा संघटक विरळाच.
सारडा कॉलेजचे क्रीडा विभागप्रमुख म्हणून त्यांनी प्रदिर्घ काळ काम पाहिले. अनेक खेळाडूही घडवले. प्रत्येक खेळाच्या स्पर्धेत आपल्या कॉलेजचा संघ सहभागी हवाच यासाठीही दिनुभाऊ आग्रही असायचे ते केवळ क्रीडा क्षेत्रावरील निस्सीम प्रेमापोटीच. त्यांचा खरा ओढा देशी खेळांकडेच राहिला. खो-खो, मल्लखांब खेळाच्या संघटना स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. मल्लखांबाचे उत्कृष्ट संघटक म्हणूनही त्यांनी पुरस्कार मिळवला. ज्युदो, अ‍ॅथलेटिक संघटनेचेही ते सल्लागार होते. कबड्डी, बास्केटबॉल, जिमनॅस्टिकचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. क्रीडा परिषद, विद्यापीठ निवड समिती, कृषी विद्यापीठाची क्रीडा समिती, शिवत्रपती पुरस्कार निवड समिती अशा राज्य पातळीवरील समित्यांवर काम करताना खेळाडूंची निवड गुणवत्तेवरच असावी, यासाठी ते ठाम मत व्यक्त करत. इतर वेळी मैदानावरचा त्यांचा स्वभाव मृदूभाषी अशाच होता. खेळाडूंना कठोरपणे रागावताना कोणी त्यांना कधी पाहिले नाही.
नगर कॉलेजचे प्रा. मंगलसिंग धाकामुळे जसे विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिले तसे सारडा कॉलेजचे दिनुभाऊ प्रेमळपणामुळे. हाडाचे क्रीडाशिक्षक ही बिरुदावली त्यांना शोभणारी होती. राष्ट्रीय छात्रसेनेच्या चळवळीतही ते सहभागी होते. ५७ व्या महाराष्ट्र बटालियनचे ते मेजर होते. त्यामुळेच अनेकजण सार्वजनिक जीवनात त्यांना मेजर म्हणूनही हाक मारत. त्यांचे बंधू कॅप्टन बांगलादेश युद्धात शहीद झाले. श्रीसमर्थ विद्या प्रसारक मंडळ, अ‍ॅकॅडमी ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थांचे दिनुभाऊ संस्थापक सदस्य. शांत परंतु अव्याहतपणे काम करण्याची धडाडी शिक्षण क्षेत्रातही दाखवत, त्या नावारुपाला आणण्यात योगदान दिले. महादेव वासुदेव कुलकर्णी नावाऐवजी नगरकरांशी ते ‘दिनुभाऊ’ या आपुलकीच्या नावानेच जोडले गेले होते. हाच आपुलकीचा वारसा त्यांनी आपल्या कुटुंबातील पुढच्या पिढीला दिला. त्यातूनच त्यांचे चिरंजीव डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी ‘स्नेहालय’ची उभारणी केली. दिनुभाऊ स्नेहालयचे पहिले देणगीदार होते. दिनुभाऊंची आठवण नगरकरांच्या कायम स्मरणात राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 2:46 am

Web Title: ground keep quit
Next Stories
1 रेल्वेची मोटारीला धडक, पंढरपूरजवळ पाच ठार
2 ठाकरे जयंतीनिमित्त हिंदुत्व मशाल यात्रा
3 पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघासाठी साडेअकरा कोटींची विकासकामे मंजूर
Just Now!
X