बचतगट व महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने ‘गृहिणी महोत्सव २०१३’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिमा सतेज पाटील यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये बचतगटांसाठी मोफत स्टॉल दिले जाणार आहेत. महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बचतगटांनी २८ फेब्रुवारीपर्यंत आपले अर्ज अजिंक्यतारा येथील कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
 बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम होत आहेत. पण बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी गृहिणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. दरवर्षी ‘जागतिक महिलादिन’चे औचित्य साधून हे आयोजन केले जाते. महोत्सवाचे हे दहावे वर्ष असून यापूर्वीच्या नऊ महोत्सवांना सर्वच थरातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षी ट्रस्टने ७ ते ९ मार्च या काळात दुपारी ३ ते रात्री १० यावेळेत व शनिवार दि.९ मार्च रोजी पूर्ण दिवस जरगनगर कॉर्नर, संभाजीनगर येथील मैदानामध्ये महोत्सवाचे आयोजन केले आहे. गुरुवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
या महोत्सवात खाद्यपदार्थ, इमिटेशन ज्वेलरी, कपडे, आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधने, हस्तकलेच्या वस्तू, लहान मुलांचे कपडे, वीणकाम, विविध प्रकारच्या बॅगा आदींच्या प्रसिद्धी व विक्रीसाठी मोफत स्टॉल्स देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक बचतगटांना आपल्या बँक पास बुकाची झेरॉक्स प्रत सही शिक्क्यासह ‘अजिंक्यतारा’ या कार्यालयात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.     
या महोत्सवादरम्यान रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध राज्यांतील समूह लोककला नृत्य स्पर्धा, झिम्मा स्पर्धा, उखाणे स्पर्धा (ग्रामीण महिलांसाठी), गृहिणी पैठणी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, खाद्य स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, पाककला कृती स्पर्धा आदी मनोरंजनात्मक, प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन तसेच ‘मिसेस गृहिणी २०१३’ ही व्यक्तिमत्त्व स्पर्धाही आयोजित केली आहे. तसेच शनिवार दि. ९ मार्च रोजी होणाऱ्या समारोपप्रसंगी यशस्वी महिला उद्योजकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. त्यासाठी इच्छुक महिला उद्योजकांनी संपूर्ण माहितीसह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहनही ट्रस्टच्या वतीने जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील यांनी केले आहे.