घरोघरी फुलांचे व आंब्याच्या पानाचे तोरण.. शहरातील विविध भागात काढण्यात आलेल्या रंगबेरंगी रांगोळ्या.. नऊवारी पातळात नटलेल्या महिला व तरुणी.. शहरभर उभारलेल्या लहान मोठय़ा गुढय़ा. चौकाचौकात फटाक्याची आतषबाजी.. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्याचे गुलाब पुष्प, भगवा ध्वज व पेढे देऊन स्वागत आणि शोभायात्रा काढत भारतीय नववर्षांचा पहिला दिवस आज उत्साहाच्या वातावरणात नागरिकांनी साजरा केला. नागरिकांनी ऐकमेकांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.
यावर्षी नवे वर्ष साजरे करण्यासाठी अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी पुढाकार घेतल्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते. चौकाचौकात भगव्या पताका आणि तोरणे लावण्यात आली होती. आज सकाळी घरोघरी मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यानंतर सकाळी देवाची पूजा आणि त्यानंतर घरावर किंवा प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारण्यात येऊन पूजा करण्यात आली.
शहरातील विविध भागात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. शंकरनगर, लक्ष्मीनगर, रामदासपेठ, प्रतापनगर, बडकस चौक, चिटणीस पार्क, गोकुळपेठ, इतवारी, प्रतापनगर, छत्रपतीनगर चौक, सक्करदरा, नंदनवन, वर्धमाननगर, पाचपावली आदी भागात अनेक युवक युवती रस्त्यानी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना गुलाबाचे फूल आणि पेढे देऊन नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत होते. लक्ष्मीनगर , बडकस चौक, प्रतापनगर आदी भागातील महिलांना रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त बडकस चौकात त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला. बडकस चौकात संवेदना परिवारातर्फे ११ गुढय़ा गुढी उभारण्यात येऊन प्रभूरामचंद्राच्या जयजयकार करण्यात आला. लक्ष्मीनगरात हनुमानाच्या मंदिरात परिसरातील नागरिकांनी नववर्षी साजरे केले. शहरातील विविध भागातील झोपडपट्टी भागात राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी रांगोळ्या काढून गुढी उभारल्या आहेत.
सकाळी सहा वाजून वीस मिनिटानी शुक्रवार तलावात सूयप्रतिभेचे प्रतिबिंब उमटले आणि शुक्रवार तलावाच्या काठी असलेल्या नागरिकांनी सूर्याला ओवाळून व वंदन करून नववर्षसूर्यदर्शन सोहळा साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. पहाटे पाच वाजेपासून एक एक करीत शोकडो नागरिक शुक्रवार तलावाच्या काठी जमा झाले होते.
रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध सामाजिक संघटनातर्फे शहरातील विविध भागातील चौकांमध्ये मोठय़ा गुढय़ा उभारण्यात आल्या. चिटणीसपार्क चौकात नगरसेवक प्रवीण दटके व बंडू राऊत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नवीन वर्षांचे स्वागत केले. यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
 चिटणीस पार्क चौकात झालेल्या कार्यक्रमात मुस्लिम समुदायातील अनेक लोक सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देत होते. यावेळी नव्या वर्षांचा संकल्प करीत २१ फुटाची गुढी शहरातील विविध भागात पाडवा पहाटचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.