गुढी पाडवा अर्थात हिंदु नववर्षांचे स्वागत खास भारतीय परंपरेने करण्याची लगबग भल्या पहाटे शहरातील विविध भागात सुरू होणार असली तरी या सणावर यंदा दुष्काळाचे सावट पसरल्याचे अधोरेखीत होत आहे. गुढीपाडवा हा खरेतर वर्षांतील पहिला सण. दरवर्षी उत्साहपूर्ण वातावरणात तो साजरा केला जातो. यंदा उत्तर महाराष्ट्रातील शहरी भागात नववर्षांच्या स्वागताची जय्यत तयारी केली गेली असली तरी ग्रामीण भागात मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे बाजारपेठेत नेहमीचा जोश पूर्वसंध्येला पहावयास मिळाला नाही.
उत्तर महाराष्ट्रातील शहरांबरोबर ग्रामीण भाग सध्या तीव्र पाणी टंचाईच्या संकटात सापडला आहे. नाशिक वगळता धुळे, जळगाव व नंदुरबार शहरात तीन ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. शहरात ही स्थिती असताना ग्रामीण भागात तर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दुष्काळाच्या दाहकतेचा परिणाम गुढी पाडवा या सणावर झाल्याचे दिसत आहे. गुढी पाडवा म्हणजे साडे तीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त मानला जातो. या मुहुर्तावर सोने, घरकुल, वाहन वा तत्सम खरेदीला प्राधान्य दिले जाते. या अनुषंगाने शहरी भागातील व्यावसायिकांनी प्रसिद्धी तंत्राचा वापर करून ग्राहकांना आकृष्ट करण्याचे प्रयत्न चालविले असले तरी दुष्काळ व महागाईचे सावट यंदा राहणार असल्याचे दिसत आहे. शहरी भागात काही अंशी अशा खरेदीला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असली तरी ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये फेरफटका मारल्यास विपरित चित्र असल्याचे लक्षात येते. पावसाअभावी शेतीतून अपेक्षित उत्पन्न हाती पडू शकले नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या हाती फारसा पैसा पडला नसताना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम ग्रामीण भागातील बाजारपेठेवर झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. गुढीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये गर्दी झाली असली तरी त्या व्यतिरिक्त इतर खरेदीला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे व्यावसायिकांचे लक्ष आहे.
गुढी पाडव्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. श्री काळाराम संस्थानच्यावतीने आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते तर पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. १८ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नववर्ष स्वागत यात्रांच्या माध्यमातून यंदा प्रथमच जल संवर्धन व पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे. गुरूवारी पहाटे शहरातील विविध भागातून स्वागत यात्रांना प्रारंभ होणार आहे. त्यात इंदिरानगर, राणेनगर, चेतनानगर, सिडको, गंगापूर रोड, महात्मानगर, तिडके कॉलनी, संभाजी चौक, कॉलेज रोड, अशोकनगर, सातपूर कॉलनी, जाधव संकुल आदी परिसरांचा समावेश आहे. वेगवेगळ्या भागातून निघणाऱ्या या शोभायात्रा आपापल्या परिसरात एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित येतील आणि त्या ठिकाणी त्यांचा समारोप होईल. चित्ररथ, यात्रा मार्गावर रांगोळ्या, स्त्री भ्रुणहत्येवर पथनाटय़ाचे सादरीकरण, मल्लखांबची प्रात्यक्षिके, सायकलस्वारांचे खास पथक, लेझिम पथक, विविधांगी वेशभूषा साकारणारे विद्यार्थी असे नियोजन स्वागत यात्रा समित्यांनी केले आहे.
लायन्स क्लबच्यावतीने गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता शासकीय कन्या शाळेत सेवाकार्याची गुढी उभारली जाणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हाधिकारी विलास पाटील, उपजिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित राहणार आहे. मनमाडचे आराध्य दैवत असलेल्या श्री निलमणी गणेश मंदिर ट्रस्टच्यावतीने यंदा गुढीपाडवा ते श्री हनुमान जयंती या काळात धर्म ध्वज महोत्सवाचे आयोजन केले आहे. नागरिकांनी विजयाची गुढी उभारतानाच त्याबरोबर धर्मध्वज गुढीबरोबर लावावा म्हणून ट्रस्टने तीन हजार ध्वजाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.