मखमलाबाद परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी ‘चाइल्ड लाइन’ संस्थेच्या वतीने ख्रिसमसनिमित्त आयोजित कार्यशाळेत मुलांना टोल फ्री क्रमांक, त्यावरील हेल्पलाइन या विषयीची माहिती देण्यात आली. याशिवाय मैदानी स्पर्धा घेण्यात येऊन व्यसनांचे दुष्परिणामही समजावून सांगण्यात आले. प्रवीण आहेर यांनी विविध विभागांच्या हेल्प लाइनविषयी माहिती दिली. मुलांना व्यसनाचे दुष्परिणाम व आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयावरील नाटिका दाखविण्यात आली. नृत्य, गाणे यावर आधारित मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.   मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. माया बिरारी, नितीन कांडेकर यांनी मुलांच्या समस्या व अभिप्राय जाणून घेत त्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले.मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित केले. मनीषा खर्चाणे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा समन्वयक प्रणिता तपकिरे यांनी आभार मानले.
नाइट हायस्कूलमध्ये वार्षिक सोहळा
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित नाइट हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सेवानिवृत्त शिक्षिका कल्पना वैद्य यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी वैद्य यांनी नाइट हायस्कूलमधील विद्यार्थी हे दिवसाच्या शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे असल्याचे मत मांडले. हे विद्यार्थी स्वत:च पालक असून त्यांच्यावर कुटुंबीयांबरोबरच समाजात चांगले स्थान मिळवण्यासाठी शिक्षण घेण्याची धडपड दिसून येते असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना बोधात्मक गोष्टीच्या माध्यमातून शिक्षणाची आवश्यकता व विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वासाचा अभाव या विषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी कुमावत होते. मुख्याध्यापक संजय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. राजेश कायस्थे यांनी सूत्रसंचालन केले. गोरखनाथ क्षीरसागर यांनी आभार मानले.
‘सीडीओ मेरी’मध्ये विद्यार्थ्यांचा गौरव
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये वार्षिक कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष डी. एस. कुळकर्णी होते. नगरसेवक रुची कुंभारकर, गणेश चव्हाण, सुनीता शिंदे, कार्यवाह शशांक मदाने या वेळी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. शालेय अहवाल यादव आगळे यांनी सादर केला. मान्यवरांचा परिचय दिलीप अहिरे यांनी करून दिला. कवी पाठक यांनी बालकविता सादर करून कविता निर्मितीबाबत माहिती दिली. श्वेता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मुग्धा काळकर यांनी आभार मानले.