बालकल्याण संस्थेतर्फे अपंग विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘बहुउद्देशीय अपंग मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून ५ डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर कर्णबधिर मुलांसाठी मार्गदर्शन सुरू करण्यात येत आहे. गणेशखिंड रस्त्यावरील संस्थेच्या परिसरात दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळात केंद्राचे कामकाज चालेल. या केंद्राचा लाभ घेण्यासाठी पालकांनी ०२०- २५६६५९५३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या व्यवस्थापक मिनिता पाटील यांनी केले आहे.
कर्णबधिरत्व लहान वयातच लक्षात आले, तर श्रवणयंत्राच्या साहाय्याने बालकाला प्रशिक्षण देऊन त्याला बोलता येऊ शकते. तसेच त्याला सर्वसाधारण मुलांच्या शाळेत शिक्षणही घेता येऊ शकते. याबाबत अशा मुलांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी या केंद्रात ऑडियोलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट उपलब्ध असणार आहेत. तसेच ज्या कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र व प्रशिक्षणाच्या साहाय्याने भाषा विकास करता आला, अशा मुलांचे पालकही केंद्रात आपले अनुभव सांगण्यासाठी उपलब्ध होऊ शकतील.