बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासंदर्भात अधिक माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.   
उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना आवश्यक असणारी माहिती तात्काळ मिळणे आवश्यक असते. त्यासाठी त्यांना अनेक ठिकाणी जावे लागते. एखाद्या छोटय़ाशा माहितीसाठी संबंधित महाविद्यालयात जावे लागते. या गोष्टी लक्षात घेऊन अजिंक्यतारा कार्यालयात संगणक प्रणाली कार्यरत केल्याचे पाटील यांनी सांगितले. यासाठी कोल्हापूर शहरातील विविध महाविद्यालये, त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या शाखा, त्यामधील अभ्यासक्रम आदी माहिती हवी असल्यास त्या विद्यार्थ्यांने महाविद्यालयाचे नाव व आवश्यक माहितीबाबतचा ‘एसएमएस’ ९९२३२४३२१० या मोबाइल क्रमांकावर करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांला एसएमएसद्वारेच ही माहिती पाठविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा. रमेश रणदिवे, अजिंक्यतारा ऑफीस, ताराबाई पार्क यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.