बलात्कारासारख्या संवेदनशील गुन्ह्य़ाचा कसा तपास करावा, या विषयावर पोलीस आयुक्तालयात आयोजित विशेष चर्चासत्रात पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोपीची वैद्यकीय तपासणी, पंचनामे, जप्त वस्तूंचा पंचनामा, स्व्ॉब कलेक्शन, वैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका, वैद्यकीय तपासणीतील बाबींवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पोलीस दल अधिक सशक्त व्हावे, या साठी विविध चर्चासत्रे घेण्याचे ठरविले आहे. बलात्काराच्या गुन्ह्य़ात कशा पद्धतीने तपास असावा, या विषयी नाशिक येथील गुन्हे अन्वेषण केंद्रामार्फत आयोजित या चर्चासत्रात मराठवाडय़ातील ८० पोलीस हवालदार सहभागी झाले होते. उद्घाटन उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी केले. बलात्कारासारख्या गुन्ह्य़ाच्या तपासात विशेष दक्षता घ्यावी, असे या वेळी सांगण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉ. वर्षां देशमुख यांनी वैद्यकीय तपासणीतील महत्त्वाच्या बाबी आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची भूमिका समजावून सांगितली. न्याय सहायक प्रयोगशाळेकडे नमुने कसे पाठवावे, या विषयीही मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, विश्वास पाटील, गोकुळ वाघ आदींची उपस्थिती होती.