गुंफण अकादमीतर्फे देण्यात येणारा गुंफण गुणगौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या बुद्धिबळपटू व पत्रकार जयश्री खाडिलकर-पांडे यांना जाहीर झाला असल्याची माहिती अकादमीचे प्रमुख बसवेश्वर चेणगे यांनी दिली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाज प्रबोधन व समाजपरिवर्तनासाठी अनमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या गौरवार्थ अकादमीतर्फे हा पुरस्कार दिला जातो.
मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी गुंफण गुणगौरव पुरस्काराने ग्रामीण कथाकार बबन पोतदार, उद्योजक मधुकर सावंत, वसंतराव फडतरे, प्रा. एस. बी. भोसले, चित्रपट कथालेखक प्रताप गंगावणे, प्रा. मदनराव जगताप, शांताराम बेर्डे यांना सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराच्या यंदाच्या मानकरी वयाच्या सातव्या वर्षांपासून बुद्धिबळाच्या पटावर रमलेल्या जयश्री खाडिलकर-पांडे यांनी वयाच्या तेराव्या वर्षी १९७५ मध्ये भारताची नॅशनल बुद्धिबळ चॅम्पियन होण्याचा पराक्रम केला आहे. भारताची पहिली वूमन इंटरनॅशनल मास्टर, पहिली ब्रिटिश कॉमनवेल्थ (महिला) चॅम्पियन, ऑलिम्पिक स्पध्रेत भारतीय संघातून पाच वेळा प्रतिनिधित्व करण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.