शहर परिसरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने गुरूपौर्णिमा विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शाळांतील सर्व मुख्याध्यापकांचा सत्कार व शिक्षक संमेलनाचे आयोजन मनसेच्यावतीने आ. नितीन भोसले यांनी केले होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ  इतिहास संशोधक पुरातत्वज्ञ, दुर्ग अभ्यासक आणि शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांचे ‘गुरूविण कोण दाखविल वाट’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमास आ. उत्तम ढिकले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, आ. नितीन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. भोसले यांनी आपणास परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नसल्याने मतदारसंघातील सर्व शाळांच्या विकासावर अधिक भर दिला असल्याचे नमूद केले. मतदार संघातील सर्व शाळांसाठी संगणक, प्रोजेक्टर, नववी व दहावीच्या १०६१० विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके, एमपीएससी पुस्तके, सीडी आदी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना घडविणारा केंद्रबिंदू म्हणजे शिक्षक वर्ग. या शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी शिक्षक संमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. बलकवडे यांनी गुरू-शिष्य परंपरा किती अपरंपार आहे हे भारतीय संस्कृती व इतिहासाचे अनेक दाखले देत स्पष्ट केले. यावेळी मतदार संघातील ९० शाळांचे ५५० शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
सीडीओ मेरी शाळेत कार्यक्रम
नाशिक येथील सीडीओ मेरी हायस्कूलमध्ये गुरूपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सकाळ सत्रात उपमुख्याध्यापिका गीता कुलकर्णी तर दुपार सत्रात मुख्याध्यापक आ. का. वाणी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सहकार्यवाह दिलीप अहिरे, पर्यवेक्षिका मुग्धा काळकर, मुक्ता सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते. गुरूपौर्णिमा कार्यक्रमास दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांनी गुरूची महती सांगणारे मनोगत व्यक्त केले. गुरू दिशा देण्याचे व उत्तम संस्कार करण्याचे काम करतात असे आहिरे यांनी सांगितले. सर्वानी गुरूंचा आदर्श ठेऊन आदर केला पाहिजे. आदर्श शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिते असे शीला गायधनी यांनी सांगितले. आरती ठकार यांनी गुरूशिष्याचे नाते यावर नाटिका सादर केली.

उन्नती प्राथमिक विद्यालय
उन्नती प्राथमिक विद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त विद्यार्थी व्यास यांची वेशभुषा करून आले होते. तसेच भक्तीधाम मधील महामंडलेश्वर सविदानंद सरस्वती यांचे शिष्य कृष्णा जोशी, प्रसाद पंडित, हर्षल कुलकर्णी, परमेश्वर धर्माधिकारी यांनी विद्यालयाच्या प्रांगणात येऊन गुरू पौर्णिमेची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी सरस्वती पूजन केले. धांडे यांनी गुरूपौर्णिमेचे महत्व मांडले. जीवनात जे जे चांगल्या सवयी लावतात तेच गुरूस्थानी असतात असेही ते म्हणाले. अश्विनी आहिरे यांनी सूत्रसंचालन केले.

सारडा कन्या शाळा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सारडा कन्या विद्यामंदिरात गुरूपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेखा सोनवणे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सविता खरे होत्या. यावेळी सोनवणे यांनी कठोर साधना केल्याशिवाय ज्ञान प्राप्त करता येत नसल्याचे सांगितले. आत्मविश्वास, पुरूषार्थ, मनाची एकाग्रता, उच्च ध्येय आणि प्रतिकूलतेवर मात व समाजसेवा या सप्त ध्येयाची शिडी चढावी लागते. रामकृष्ण परमहंस-विवेकानंद, रामदास स्वामी-शिवाजी महाराज या गुरू-शिष्यांच्या गोष्टी सांगून ज्ञानाचे आदान-प्रदान व गुरूचे महत्व त्यांनी पटवून दिले. सुनंदा जगताप यांनीही गुरूचे महत्व सांगितले. सबा शेख हिने आभार मानले.

सावंत महाविद्यालय
नाशिक येथील जी. डी. सावंत महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागात ‘गुरू-शिष्य परंपरेचे महत्व’ या विषयावर गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी टी. आय. पठाण, प्रा. एन. बी. पाटील, प्रा. जे. आर. चव्हाण, प्रा. हिना शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमात निशा चौधरी, उज्ज्वला शिरसाठ, रवींद्र ठाकरे, तुषार अहिरे, शितल भालेराव, रोहित पाटील, विनोद इंगोले, प्रियंका पाटील, किरण जाधव, तानाजी जाधव, आकाश व अमोल डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापकांनीही शिष्यांविषयी आपली भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन भूगोल विभागातर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन अंकिता शेटे यांनी केले. आभार निशा चौधरी यांनी मानले.