जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांची ठेव वाढवल्यानंतरही कर्ज मर्यादेत वाढ न केल्याने, त्यासाठी आठ दिवसांची मुदत देत, बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या खुच्र्याना बांगडय़ांचा आहेर करण्याचा इशारा गुरुकुल मंडळाने दिला आहे.
गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष नितीन काकडे व प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ११ ऑगस्ट रोजी होत आहे. या पाश्र्वभूमिवर हा इशारा दिला आहे. पत्रकात त्यांनी म्हटले की, गेल्या सभेत संचालक मंडळाने सभासदांची ठेव ७०० रुपयांवरुन १ हजार २०० केल्यानंतरच आम्ही कर्जमर्यादा वाढवु असे अश्वासन संचालक मंडळाने दिल्यानेच ‘गुरुकुल’ने ठेव वाढीस मंजुरी दिली. परंतु संचालक मंडळाने कर्जाची रक्कम न वाढवता केवळ ठेव वाढवली.
गुरुकुलकडे सत्ता होती, त्यावेळी सभासदांना ११ लाख रुपये कर्ज देत होते. सत्ता बदलानंतर अचानक बँकेची आर्थिक स्थिती वाईट कशी झाली? ठेववाढीच्या फायद्यानंतर संचालकांनी लगेच संगणक दुरुस्तीच्या नावाखाली २० लाख रुपयांचा मलिदा लाटला, असा आरोप करुन पत्रकात म्हटले की, केवळ तीन-सव्वातीन लाख कर्ज देणारे संचालक मात्र श्रेष्ठींच्या मुलांना बेकायदा बढतीदेत आहेत, इतर सर्व बँकांनी कर्जाच्या मर्यादेत वाढ करुन व्याजदरही कमी केले. मात्र शिक्षक बँक सभासदांचा तोटा करत आहे.
सभासदांच्या हितासाठी आम्ही सर्वसाधारण सभा सहमतीने होऊ दिली. त्यामुळे आता होणारी सभाही तशीच होईल, या भ्रमात त्यांनी राहु नये, बदल्यांमुळे शिक्षक अस्थिर झाला आहे, त्याचा गैरफायदा घेत संचालक मनमानी कारभार करत आहेत असा आरोपही गुरुकुलने केला आहे.