शासनाने गुटखाबंदी कायदा केला असला तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे सोमवारी जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकाबाहेर निदर्शने करण्यात आली. गुटख्याच्या पुडय़ा, पानमसाला यांच्या पाकिटांची या वेळी होळी करण्यात आली.
गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन आणि अन्य व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या संदर्भात जनजागृतीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गेल्या आठवडय़ापासून व्यसनमुक्ती अभियान सुरू करण्यात आले. महिलादिनी कॅन्सरवर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. शैलेश बोंदार्डे यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. याच अभियानांतर्गत गुटख्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करणात आले. या वेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाप्रमुख प्रेरणा बलकवडे यांनी शासनाने विविध उपक्रमांद्वारे व्यसनमुक्ती अभियान राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली. शासनाने गुटखाबंदी लागू केली असली तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे आजही मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची विक्री होत असताना दिसते. त्यामुळे शासनाने गुटखा बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करतानाच गुटखा तयार करणाऱ्यांवरही बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी कोमल साळवे, अयोध्या बिल्लाडे, प्रिया पाटील, ज्योती वाघचौरे, वर्षां साळवे आदींसह मोठय़ा संख्येने युवती उपस्थित होत्या. या वेळी घोषणाबाजीही करण्यात आली.