राज्यात गुटखाबंदीची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी गुटखा शौकिनांची मात्र काहीही गैरसोय झाली नसल्याचे चित्र अजूनही सर्रास दिसत आहे. त्यांना गुटखा मिळत तर आहेच; परंतु पोलीस काहीच करीत नाहीत, अशी ओरड व्हायला नको म्हणून अधूनमधून गुटख्याच्या साठय़ावर छापे टाकण्याचे सोपस्कारही उरकले जात आहेत.
कारवाईनंतर पोलीस कर्तव्यपूर्तीचा, तर गुटखाप्रेमी गुटख्याचा आनंद लुटतात. राज्य सरकारने गुटखाबंदी लागू केल्यानंतर शेजारच्या कर्नाटकातून महाराष्ट्रात गुटखा येत असल्याची ओरड सुरू झाली. त्यानंतर कर्नाटकानेही गुटखाबंदी सुरू केली असली, तरी गुटखाशौकिनांची काहीही अडचण झाली नाही. लातूर शहरात गुटखा शौकिनांबरोबर गुटखा विक्रेत्यांनी छुपा करारच केला आहे. दररोज गुटखा शौकिनांना गुटखा घरपोच मिळतो. गुटख्याचे लेबल नको असेल तर ते कट करून पुडय़ामध्ये गुटखा बांधून कॅरीबॅगमध्ये पार्सल पाठविले जाते. १० रुपयांचा गुटखा ३० रुपयांना विकला जातो. दररोज किमान १५ ते २० गुटख्याच्या पुडय़ा खाणारे शौकिन शहरात मोठय़ा संख्येने आहेत. या कानाची खबर त्या कानाला लागू न देता निर्धोकपणे हा उद्योग सुरू असल्यामुळे सारे काही आलबेल चित्र आहे. सरकारने गुटख्यावर कागदोपत्री बंदी आणून स्वत:ची पाठ थोपटून घेतली असली, तरी प्रत्यक्षात ही बंदी मात्र िलबूटिंबू आहे, हे गुटखाशौकिनांनी दाखवून दिले आहे.