गोवा गुटखा बॅगा पॅकिंगसह एकूण ३ लाख ३६ हजार रुपये किमतीच्या गुटखा पुडय़ांच्या ७ पोत्यांसह एकूण तब्बल १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ४ तरुणांना अटक करण्याची कामगिरी आज कराड शहर पोलिसांनी फत्ते केली. याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी दिली. सदर कारवाईमुळे कराडात लाखो रुपयांच्या गुटख्यांची नित्याची उलाढाल उजेडात आली असून, या नेटवर्कमध्ये आणखी काही मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत असले तरी कराडातील सर्वच बेकायदा उलाढाली उद्ध्वस्त केल्या गेल्या पाहिजेत अशी न्याय्य व माफक अपेक्षाही सतत चर्चेत राहिली आहे.
शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी. आर. पाटील व पथकाने गोवा गुटखा बॅगा पॅकिंगसह एकूण ७ पोती (४२ बॅगा) किंमत ३ लाख ३६ हजार यासह एमएच. ०९ सीए ११०९ किंमत रुपये ९ लाख, एमएच ११ एम ११८९ किंमत रुपये अडीच लाख तसेच मोबाईलच्या ४ बॅटऱ्या असा १४ लाख ८६ हजार ४०० रुपयांचा एकंदर मुद्देमाल हस्तगत केला आहे. याचबरोबर मज्जीद हुसेन खतीत (वय ४३), फिरोज जहांगीर शेख (वय ३६), सोमनाथ अधिकराव सूर्यवंशी (वय २२, तिघेही रा. ओगलेवाडी, ता. कराड) तसेच नरेश प्रभुनाथ गुप्ता (वय ३२, रा. बनवडी, ता. कराड) या चौकडीला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी अतुल अनिल नाईक (वय २४, धंदा-व्यापार, रा. गुजरीपेठ गावभाग इचलकरंजी) हे यापूर्वी गोवा राज्यातील गोवा गुटखा कंपनीतर्फे व्यापारासाठी वरचेवर कराडात येत असत. यावेळी त्यांची कराडच्या पाटण कॉलनीतील झाकिर पटेल या व्यापाऱ्याशी ओळख झाली. पटेल हा गेल्या ३-४ महिन्यांपासून वेळोवेळी फोन करून गुटखा आणून दे माझी परिस्थिती हलाखीची आहे. मला इतर काही कामधंदा नाही. माझे चरितार्थाची साधने बंद पडली आहेत. असे वारंवार बोलून त्यासाठी पहिजे तर भरपूर कमिशन देतो असे फिर्यादी नाईक यांच्याकडे गुटखा आणण्याची मागणी करत होता. त्यामुळे फिर्यादीने आपल्या ओळखीच्या एकाकडे गोवा गुटखा असल्याची माहिती मिळाल्याने दि. ५ ऑगस्ट रोजी त्यांच्याकडून ७ पोती (४२ बॅग) गोवा गुटखा उधारीवर खरेदी करून इचलकरंजी येथे पोहोच करून घेतला. ६ ऑगस्टला फिर्यादीस त्यांचा एक मित्र भगत डाके याची टेंपो ट्रॅव्हलर गाडी इचलकरंजी येथून पुण्याकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्याशी संपर्क साधून डाके, फिर्यादी स्वत: आणि चालक निहाल बागवान हे इचलकरंजीतील तिघेजण कराडकडे येण्यासाठी निघाले. फिर्यादीने वरीलप्रमाणे ७ पोती गोवा गुटखा त्या टेंम्पो ट्रॅव्हलरमध्ये भरून कराडकडे रवाना झाले व सकाळी ७ च्या सुमारास कराड-मलकापूर मार्गावरील हायवेच्या पादचारी पुलाजवळ असलेल्या झकिर पटेल याच्या लक्ष्मी ट्रान्सपोर्टजवळील गोडावूनसमोर पोहोचले असताना ४ अनोळखी इसमांनी गाडीच्या आडवे उभे राहून तिघांनाही गाडीत चढून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील तिघेजण ताकदवान असल्याने फिर्यादी व त्याचे मित्र सुटका करून घेऊ शकले नाहीत. यावेळी मारहाण करणाऱ्यांनी आम्ही पोलीस आहोत तुम्ही दोन नंबरचा धंदा करता, चला तुम्हाला कायद्याचा हिसका दाखवतो असे म्हणून गाडीतून खाली उतरवून घेऊन लाथा बुक्क्याने मारहाण केली. अतुल नाईक यांनी कोणासही फोन करून नये म्हणून त्यांच्याकडील व साथीदारांच्या मोबाईलमधील बॅटऱ्या काढून घेतल्या. त्यावेळी सुदैवाने फिर्यादी व झकिरच्या ओळखीचा एकजण विनय थोरात (कराड) हा तेथे दिसला. तो फिर्यादीस ओळखून सोडविण्यास आला असताना आरोपींनी त्यालाही मारहाण केली व त्याच्याही मोबाईलमधील बॅटरी काढून घेतली. मारहाण करणाऱ्यापैकी एक ड्रयव्हरसीटवर बसला व तिघे मागे बसले आणि फिर्यादीच्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हल त्यातील गुटखा व ड्रायव्हरसीट मागील ३ लाख ९३ हजार ६०० रुपये घेऊन पोबारा केला. यानंतरच्या शोधात सदरची टेम्पो ट्रव्हलर ही फिर्यादीस मलकापूर रिलायन्स पेट्रोलपंपासमोर मिळून आली. त्यावेळी त्यात ७ पोती गुटखा मिळून आला नाही म्हणून फिर्यादीने सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलीस हवालदार पी. एन. इंगळे यांना मिळालेल्या खबरीनुसार पोलीस पथकाने नमूद आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून गुन्’ाातील माल हस्तगत केला आहे.