अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांच्या कार्यालयातील टेबलवर गुटख्याच्या पुडय़ा टाकत कोल्हापूर जिल्हय़ात खुलेआम गुटखा कसा विकला जात आहे, असा सवाल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला. या कार्यालयाच्या आवारात पडलेल्या गुटख्याच्या रिकाम्या पुडय़ा दाखवत कार्यालयातही खुलेआम गुटखा खाल्ला जात असल्याचे दाखवून दिव्याखाली अंधार कसा आहे, हे कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे अधिकाऱ्यांना दाखविले. गुटखाबंदीची कठोर अंमलबजावणी न झाल्यास गुटख्याची वाहतूक करणारी वाहने पेटवून देण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.    
राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली आहे. कोल्हापूर जिल्हय़ात गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. विक्रेत्यांवर कसलाही वचक नसल्याने तो सहजपणे उपलब्ध होत असल्याने गुटखाबंदी कागदावरच राहिली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी अन्न व औषध प्रशासन विभागात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.    
युवा सेनेचे जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे, संदीप पाटील, शहर अधिकारी अजिंक्य चव्हाण, प्रतीक हांडे, कृष्णात शिखरे, अमित हंबे, सागर टिपुगडे, सागर पाटील यांच्यासह युवा सेनेचे कार्यकर्ते अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात गेले. या विभागाचे सहआयुक्त न. आ. यादव यांना जिल्हय़ात गुटख्याची विक्री खुलेआम सुरू असताना कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला. सीमाभागातून जिल्हय़ामध्ये गुटख्याची आयात मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या वेळी यादव यांनी चर्चेच्या ओघात प्रशासन कारवाई करण्यास कमी पडत असल्याची कबुली दिली.     
युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी यादव यांच्या टेबलवर गुटख्याच्या पुडय़ा टाकल्या. राज्यात गुटखाबंदी आहेतर या पुडय़ा सहजपणे कशा उपलब्ध होतात, असा सवाल उपस्थित केल्यावर अधिकारी निरुत्तर झाले. कार्यकर्त्यांनी यादव यांना घेऊन कार्यालयाच्या परिसरात फेरफटका मारला. कार्यालयाची गॅलरी व रिकाम्या जागेत गुटख्याच्या रिकाम्या पुडय़ा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. किमान या कार्यालयात तरी गुटखाबंदीची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यादव यांनी गुटखाबंदीची अंमलबजावणी कसोशीने करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर समाधानी न झालेल्या कार्यकर्त्यांनी गुटखा सेवनाने तरुणपिढी उद्ध्वस्त होत असल्याचे सांगत गुटखा वाहतूक करणारी वाहने पेटवून देण्याचा इशारा व्यक्त केला.