बहुचर्चित एचएएल एम्प्लॉईज सहकारी सोसायटीच्या २००१ ते २०११ या कालावधीत लेखा परीक्षण करताना कसूर केल्याच्या कारणावरून सहकार विभागाने लेखा परीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या संदर्भात सोसायटीच्या सभासदांनी तीन वार्षिक सर्वसाधारण सभांत ठराव मंजूर करून लेखा परीक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सहकार खात्याकडे केली होती.
एचएएल सोसायटीत २००१ ते २०१२ या काळात कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कार्यकाळात लेखा परीक्षकांनी कायद्याप्रमाणे लेखा परीक्षण करून वेळीच कारवाई केली असती तर भ्रष्टाचार झाला नसता आणि सोसायटी वाचली असती, असे सभासदांचे म्हणणे आहे.
सभासदांनी लेखा परीक्षकांवर गुन्हे दाखल करण्याच्या केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी यासाठी एचएएल सोसायटी नवनिर्माण कृती समितीचे समन्वयक प्रवीण तिदमे यांच्या नेतृत्वाखाली नोव्हेंबर महिन्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषणही केले होते.
त्यानंतर जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ सहकारी संस्था यांनी लेखा परीक्षण अहवालाची छाननी केली. त्या पाश्र्वभूमीवर, तुषार बाजीराव पगार (नाशिक), डी. एम. बारस्कर (अहमदनगर), जयंत व्ही. कोळपकर अ‍ॅण्ड कंपनी (पुणे), बिपीन जैन (धुळे), सतीष बन्सीलाल संघवी (नाशिक) आणि एस. आर. करवा अ‍ॅण्ड कंपनी (नाशिकरोड) यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. याची माहिती कृती समितीने दिली.
संबंधितांना पाठविलेल्या नोटिसीत लेखा परीक्षण छाननी अहवालात समोर आलेल्या गंभीर मुद्दय़ांचा उल्लेख सहकार विभागाने केला आहे. संचालक मंडळाने २००६ ते ११ या कालावधीत २६.२५ कोटी रुपयांची रक्कम पूर्वपरवानगी न घेता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये केलेल्या मुदतठेव गुंतवणुकीत १७ कोटींची अफरातफर व गैरव्यवहाराच्या आक्षेपावर लेखा परीक्षकांनी त्यांच्या अहवाल वर्षांत गुंतवणूक वा मुदत ठेव नूतनीकरणाबाबत कोणतेही शेरे नमूद नाहीत. २११.०१ लाख भागभांडवल परत केले. मात्र भागमूल्यांकनानुसार रक्कम परत करण्याबाबत शेरे नमूद नाहीत, लेखा परीक्षकांनी लेखा परीक्षणावेळी योग्यरीत्या तपासणी करून गुंतवणुकीची खात्री केली नाही, लेखा परीक्षणात तेरीजपत्रक जोडले नसल्याने किती भागभांडवल परत केले आहे याची रक्कम नमूद करता येत नाही अशा विविध बाबी नोटिसीत नमूद करण्यात आल्या आहेत.
जिल्हा उपनिबंधकांनी लेखा परीक्षकांना नोटीस बजावत कारवाई सुरू केल्यामुळे सभासदांनी तिचे स्वागत केले आहे. पाच हजार कुटुंबांचा आर्थिक आधार असणारी सोसायटी पुनरुजीवित होईपर्यंत आमचा लढा सुरू राहणार असल्याचे सोसायटी नवनिर्माण कृती समितीने म्हटले आहे.