बँक ऑफ इंडियामधील बचत खाते हॅक करून अमेरिकेतील अटलांटामध्ये असलेल्या व्यापाऱ्याकडे तीन लाख ८४ हजारांची खरेदी करून फसवणूक करणाऱ्या अज्ञात भामटय़ाविरुध्द सोलापुरात सदर बझार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात मनीष जयंत आराध्ये (वय ४१, रा. शांतिसागर मंगल कार्यालयाजवळ, रेल्वे लाईन्स, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आराध्ये यांचे बँक ऑफ इंडियाच्या रेल्वे लाईन्स शाखेत बचत खाते आहे. परंतु या बचत खात्याला कोणीतरी अज्ञात भामटय़ाने हॅक करून अमेरिकेतील अटलांटा येथील टारगेर नावाच्या दुकानातून तीन लाख ७७ हजार ६८९.९६ रुपयांचे सेल-६४०५, तसेच पीच ट्री-इंड येथून १५४४.८३ रुपये किमतीचे एक्झोन मोबाईल आणि इतर दुकानांतून अन्य काही वस्तू खरेदी केल्या. त्याची एकूण किंमत तीन लाख ८३ हजार ५५८ रुपये एवढी आहे. ही संपूर्ण रक्कम आराध्ये यांचे बचत खाते हॅक करून परस्पर काढून घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे आढळून आले. ही फसवणूक भारतीय वेळेनुसार ५ जानेवारी रोजी पहाटे ४ ते सकाळी ८.४१ या वेळेत झाली आहे. हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच आराध्ये यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने सदर बझार पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुध्द भारतीय दंड संहिता कलम ४२०, आयटी अ‍ॅक्ट कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.