आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन सुखकारक व सोयीस्कर झाले आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. शाळेतील मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण या तांत्रिक करामतींची फळे चाखत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाची दुधारी तलवार आता आपल्यावरच उलटू पहात आहे. केवळ गुन्हेगारच नाही तर दहशतवादीही या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर करू लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे सतत नावीन्य बाळगणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या वापरात हे गुन्हेगार सर्वसामान्यांच्या चार पावले पुढे आहेत, हेही स्पष्ट झाले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून गेल्या काही महिन्यांत घडलेले अनेक चमत्कारिक गुन्हे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. यात व्हीओआयपी कॉल, स्पूफ कॉल, वेबसाइट हॅक, चोरलेल्या वस्तू विकण्यासाठी संकेतस्थळांचा वापर करणे आदी प्रकारांचा समावेश आहे.

’ व्हियोआयपी कॉल
एखाद्याला आपण कॉल केला की त्या व्यक्तीला आपला क्रमांक दिसतो. आपण कुठून फोन केला त्याचे स्थान (लोकेशन) समजते. परदेशात सक्रिय असणाऱ्या गुंडांच्या टोळ्यांतील गुन्हेगार भारतात किंवा कुणालाही फोन करण्यासाठी व्हिओआयपी कॉलचा वापर करतात. व्हिओआयपी म्हणजेच (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल). या यंत्रणणेत कुठल्याही देशाच्या सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरचे सव्‍‌र्हर वापरून कॉल करता येतो. त्यामुळे कुणी आणि कुठून फोन केला आहे ते समजून येत नाही. मुंबईवर झालेल्या २६-११ चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कराचीमधील दहशतवादी ऑस्ट्रेलियाचे सव्‍‌र्हर वापरून मुंबईतील दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. ही प्रणाली त्यावेळी प्रथम समोर आली.
’ स्पूफ कॉल
दोन कोटींची खंडणी मागणाऱ्याएकाला खंडणीविरोधी पथकाने गेल्या आठवडय़ात अटक केली. अटक केलेल्या आरोपीला तंत्रज्ञानाची बरीच माहिती होती. त्यांनी खंडणी मागण्यासाठी स्पूफ कॉलचा वापर केला. स्पूफ कॉल म्हणजे आपण कुणालाही कॉल केला तर समोरच्याला आपला मूळ क्रमांक न दिसता भलताच एखादा क्रमांक दिसतो. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकाला खंडणीसाठी गुंड फोन करत होते. प्रत्यक्षात त्याच्या मोबाइलवर त्याच्याच कार्यालयाचा क्रमांक दिसत होता. त्यामुळे सारेच चक्रावले होते. मोबाइलमध्ये स्फूफ कॉल हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून धूळफेक करणारे कॉल करता येतात.
’ म्हाडाची वेबसाईट
म्हाडाच्या घरांसाठी सदनिकांची जाहिरात निघाली की म्हाडाच्या संकेतस्थळाला लाखो जण भेट देतात. परंतु हे संकेतस्थळच हॅक झाले तर? सायबर सेलने याचा तपास करून बंगळूर येथून एका अभियंत्याला अटक केली. तो अनेक राज्यांची गृहनिर्माण आणि अन्य महत्वाची संकेतस्थळे हॅक करत होता. तो एक बनावट संकेतस्थळ उघडून त्यातील एक लिंक खऱ्या संकेतस्थळाला जोडत होता. इच्छूक नागरिकांनी इंटरनेटवर म्हाडा लॉटरी सर्च केल्यावर हे बनावट संकेतस्थळ समोर येत होते. या मागे साधे अर्थकारण होते. संकेतस्थळाला जेवढ्या हीटस मिळतात त्या प्रमाणात संकेतस्थळाच्या मालकाला गुगलतर्फे पैसे मिळतात. त्यामुळे हा आरोपी नामांकित संकेतस्थळांचे बनावट संकेतस्थळ उघडून हिटस मिळवत होता, एका आठवडयात त्याने म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाद्वारे दीड लाख रुपये कमावले.
’ मुलीचा आवाज काढणारा मोबाइल
चीनी बनावटीच्या साध्या मोबाइलमध्ये मुलाचा आवाज मुलीच्या आवाजात रुपांतरीत करणारे एक मजेशीर अ‍ॅप्लिकेशन होते. मात्र चेंबूर येथील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी याचा आधार घेत महाविद्यालयीन तरुणांना फसवायला सुरवात केली. आपल्याशी मुलगीच बोलतेय असे वाटू लागल्याने अनेक मुले जाळ्यात सापडू लागली. मग मुलीच्या आवाजात बोलणारे तरुण या मुलांना प्रेमजाळयात फसवत आणि भेटायला निर्जन स्थळावर बोलावत. तेथे आल्यावर त्यांना लुटत असत.
’ चोरलेले मोबाइल प्रख्यात संकेतस्थळावर
ओएलक्स या संकेतस्थळावर वस्तूंची खरेदी विक्री होते. सायन पोलिसांनी नुकतेच चार आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी चोरलेले मोबाइल ओएलेक्सवर विकत होते. चोरलेले साहित्य विकण्यासाठी हे संकेतस्थळ त्यांना सहज उपलब्ध झाले आहे.