उत्तर मध्य मुंबई परिसरात सकाळपासूनच मतदानाची लगबग सुरू झाली होती. सकाळी सकाळी मतदान करणाऱ्यांमध्ये ट्रॅक सूटमध्ये आलेल्या अभिनेत्री रेखाला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या परिसरातील मान्यवरांची गर्दी सोडली तर तरुणाईची उपस्थिती तुरळकच होती. बऱ्याच लोकांकडे मतदारओळखपत्र होते व ते यादीत नाव शोधत होते. पण नाव नसल्याने ‘आहे ओळखपत्र तरी मतदानापासून वंचित’ अशी त्यांची अवस्था झाली.
खार, सांताक्रूझ आणि वांद्रे परिसरात मतदारांच्या रांगा दिसून येत असल्या तरी मोठय़ा प्रमाणावर मतदान सुरू असल्याचे चित्र नव्हते. एरव्ही उन्हात बाहेर पडणे टाळणाऱ्या लोकांनी आज मात्र त्याची पर्वा न करता मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. पण, अनेकांची नावेच मतदारयादीतून झालेली असल्याने अनेक लोकांची निराशा झाली. मतदार म्हणून ओळख पटवण्यासाठी लागणारी सगळी आवश्यक कागदपत्रे दाखवूनही त्यांना मतदानाची संधी नाकारली गेल्याने अनेकांच्या उत्साहावर पाणी फिरले.
* दादर-माहीम भागात कित्येकांच्या मतदान ओळखपत्रावरील क्रमांक आणि प्रत्यक्ष यादीतील क्रमांक वेगवेगळे होते. कित्येकांच्या घरातील मृत व्यक्तांची नावे यादीत होती, परंतु जिवंत व्यक्तींची नावे मात्र यादीतून गायब होती. तरुणांपेक्षा ज्येष्ठ लोकांची मतदानाला जास्त गर्दी होती.
* माहीममध्येपण कमीअधिक फरकाने हीच स्थिती होती. एक तरुण कुटुंबासह मतदानाला आला. स्वतचं आणि आजोबांचे नाव तपासल्यावर आईचे नाव शोधताना मृत वडिलांचे नाव सापडले, पण आईचे नाव मतदान ओळखपत्र असूनही यादीतून मात्र गायब होते. त्याचक्षणी तेथे उपस्थित अधिकाऱ्याने त्याला आईच्या नावाने पुन्हा ६ नंबरचा फॉर्म भरायला सांगितला. पण हा फॉर्म भरूनही मतदानाचा हक्क मात्र पुढच्या खेपेला बजावता येईल हे कळल्यावर तो निराश मनाने परतला.
* एका कुटुंबाला मतदान कार्डवरील नंबर चुकीचा आहे म्हणून मतदान केंद्राच्या अधिकाऱ्याने व्होटिंग स्लिपची मागणी केली. पण त्या कुटुंबाकडे निवडणूक आयोगाने दिलेली स्लिप नव्हती. पण एका पक्षाच्या उमेदवाराने वाटलेल्या स्लिप्स मात्र होत्या. क्रेंद्रातील अधिकाऱ्याने त्यांच्या स्लिप्स तपासल्या आणि मतदान करण्यास परवानगी दिली. यादरम्यान एका हवालदाराने आचार संहिता लागू झाल्याने हे बेकायदेशीर असल्याचे सांगून यावर आक्षेप नोंदवण्याचा प्रयत्न केला पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला दाद दिली नाही. शेवटी त्या कुटुंबाने मतदान केले.
* मतदान केंद्रांवर तरुणांची गर्दी तशी तुरळकच होती. परंतु ज्यांनी पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला त्यांचे फोटो आणि प्रतिक्रियांनी सोशल मीडियावर गर्दी केली होती. कित्येक तरुणांनी यादीत नाव नाही म्हणून मतदान करता न आल्याबद्दल रागही व्यक्त केला.