भारत आता पूर्णपणे पोलिओमुक्त झाला असून पोलिओनिर्मूलन मोहिमेत हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ मुख्य आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन हाफकिन संस्थेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि देशातील पहिल्या पोलिओ लस निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा असलेले डॉ. कानू दवे यांनी बुधवारी परळ येथे केले.येत्या ११ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात ‘भारत पोलिओमुक्त’ झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. पोलिओ निर्मूलन मोहिमेत ज्या संस्थांचे मुख्य योगदान आहे, त्या संस्थाच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले असून त्यात हाफकिन संस्थेचा समावेश आहे. १९४९ मध्ये भारतात सर्वप्रथम पोलिओ लस निर्मिती आणि संशोधनाचे काम ‘हाफकिन’मध्ये डॉ. कानू दवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केले आणि १९६५ मध्ये भारतात पहिल्यांदा पोलिओ लसनिर्मिती तसेच गुणवत्ता चाचणीसाठी प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली. डॉ. दवे यांच्या या योगदानाबद्दल बुधवारी हाफकिन संस्थेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश जोशी यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.वयाच्या २३ व्या वर्षी आपण ‘हाफकिन’मध्ये प्रवेश केला. ‘पोलिओ’वर तेव्हापासूनच कामाला सुरुवात केली. आज देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन झाले असून त्याचा पाया ‘हाफकिन’ने घातला आहे. हाफकिनमध्ये पोलिओ लसीची निर्मिती केल्यानंतर त्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही दर रविवारी संस्थेच्या प्रांगणात शिबीर आयोजित करत असू. पुढे या मोहिमेला इतका प्रतिसाद मिळाला की लोकांना पाय ठेवायला आणि उभे राहायला जागा नसायची. अवघ्या १० पैशांत आम्ही ही लस मुलांना देत होतो. मुलांच्या गर्दीमुळे तेथे फुगेवाले, खेळणी विक्रेते यांचीही गर्दी व्हायला लागली. पुढे रविवार हा दिवस ‘पोलिओ डोस दिवस’ म्हणून ओळखला जाऊ लागला, अशी आठवण डॉ. दवे यांनी सांगितली.
कार्यक्रमास संस्थेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. चांद गोयल, आमदार बाळा नांदगावकर, राज्याच्या गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, विद्यमान व्यवस्थापकीय संचालक संभाजी झेंडे आदी उपस्थित होते.