गेल्या महिन्यात विदर्भात झालेल्या गारपीट आणि अकाली पावसामुळे संत्राबागांची मोठय़ा प्रमाणावर हानी झालेली असताना अजूनही मदत न मिळाल्याने संत्रा उत्पादकांमध्ये अस्वस्थता आहे.
गेल्या वर्षी देखील खराब हवामानामुळे संत्रा उत्पादकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. विदर्भातील अकोला, वाशीम, नागपूर, वर्धा, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्य़ांमध्ये अकाली पाऊस आणि गारपिटीने पिकांची हानी झाली. सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्य़ातील संत्राबागांना बसला. एकटय़ा अमरावती जिल्ह्य़ात सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गारपिटीमुळे केवळ संत्र्यांची गळती झाली नाही, तर झाडांचेही नुकसान झाले. हे नुकसान दीर्घकाळ प्रभाव टाकणारे असून फलधारणेवरही त्याचा परिणाम जाणवेल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. गारपिटीमुळे मृग बहारावर आलेल्या संत्र्यांचे नुकसान केले. बहुतांश संत्रा उत्पादकांना व्यापाऱ्यांनी २५ ते ३० टक्के रक्कम संत्रा खरेदीपोटी दिली होती. उर्वरित रक्कम संत्रा तोडणीनंतर मिळणार होती. मात्र, झाडांवरील पन्नास टक्क्यांवर फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. हवामानावर आधारित पीक विमा योजनेत देखील संत्र्याला संरक्षण देण्यात आलेले नाही. संत्रा उत्पादकांचे नुकसान मोठे आहे. त्यामुळे त्यांना एकरी ६० हजार रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक संघानेही मदत तात्काळ मिळावी अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. संत्राबागांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट अजूनही संपलेले नाही. २०१२ मध्ये अतिउष्णतेमुळे एकटय़ा अमरावती जिल्ह्य़ात सुमारे ५० हजारावर संत्रा उत्पादकांच्या ४४ हजार हेक्टर क्षेत्रातील संत्राबागा कडक उन्हाने निकामी झाल्या होत्या. वातावरणातील उष्मा आणि दमट वातावरणाचा थेट परिणाम संत्राबागांवर झाला होता. त्यावेळी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या चमूने अमरावती जिल्ह्य़ातील संत्रा उत्पादनात अग्रेसर असलेल्या तीन तालुक्यांचा दौरा केला होता, तेव्हा त्यांना ८० टक्के बागांचे नुकसान झाल्याचे आढळून आले होते. नुकसानीचा आकडा सुमारे ६०० कोटी रुपयांचा होता. सरकारकडून मात्र अत्यंत तोकडी मदत मिळाली. विदर्भात विशेषत: अमरावती आणि नागपूर जिल्ह्य़ात सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्रात संत्र्याच्या बागा आहेत. यातील ७० टक्के मृग आणि ३० टक्के आंबिया बहार घेतला जातो. मृग पूर्णत: पावसावर अवलंबून असतो. यंदा मान्सूनच्या पावसाने चांगली साथ दिली, पण अकाली पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांना फटका बसला. गारपिटीमुळे होणारी फळगळती ही संत्रा उत्पादकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. सरकारी यंत्रणेकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्याचे अहवाल देखील तयार करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही मदतीची घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी संत्रा उत्पादकांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.