अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात कांदा बियाण्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा विपरित परिणाम पुढील काळात लागवड होणाऱ्या लेट खरीप, खरीप तसेच रब्बी हंगामावर होणार आहे. गारपिटीमुळे कांदा बिजोत्पादनही धोक्यात आले आहे. त्यामुळे बियाण्यांची साठवणूक करण्यासाठी शीतगृहाचा वापर करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
मागील दहा ते पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागास अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. त्याचा फटका मोठय़ा प्रमाणात कांदा पिकाला बसला. हजारो हेक्टरवरील पीक उध्वस्त झाले. परंतु, हे संकट इतक्यावर सिमीत राहणार नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. गारपिटीमुळे शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचेही नुकसान झाले आहे. या सर्वाची परिणती कांदा बिजोत्पादनात घट होण्यात झाली असल्याचे दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. इ. पलांडे यांनी दिली. चितेगाव येथील राष्ट्रवादी फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात कांदे व लसुण या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड रब्बीमध्ये मोठय़ा प्रमाणात केली जाते. रब्बी हंगामात अधिक उत्पादन घेऊन त्याची योग्य पध्दतीने साठवणूक महत्वाची असते. कांदा बिजोत्पादन स्वत:च कांदा उत्पादन घेत असतात. परंतु, सततचा अवकाळी पाऊस, गारपीट, हवामानात झालेले बदल यामुळे कांदा बिजोत्पादन धोक्यात आले आहे. पुढील काळात कांदा लागवडीसाठी कांदा बिजोत्पादनाची कमतरता भासणार आहे. परिणामी, कांदा दरात वाढ होणे अटळ असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे.