जि. प. अध्यक्ष लंघे यांची घोषणा
गोपालन व शेती व्यवसायात महिलाच अधिक कष्ट करत असल्याने जिल्हा परिषद पुढील वर्षीपासून आदर्श गोपालक व आदर्श शेतकरी पुरस्कारांमध्ये महिलांना ५० टक्के स्थान देणार आहेत. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांनी मांडलेल्या प्रस्तावात जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी जाहीर सभेत मान्यता दिली.
जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी आदर्श गोपालक व आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण केले जाते, यंदाही प्रत्येक गटातील एक याप्रमाणे एकूण १८९ पुरस्कारांचे वितरण आज सकाळी सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर सुरू असलेल्या बचतगटांच्या प्रदर्शनात जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, तसेच जि. प. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी लंघे होते.
शेतकऱ्यांचे व गोपालकांच्या कष्टाचा हा गौरव असल्याचा उल्लेख लंघे यांनी केला. कृषी व दूध धंद्याच्या प्रश्नांचा मंत्री पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ात टंचाई निवारणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती देत आगामी काळात टंचाई अधिक तीव्र होणार असल्याने या काळात प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहील, अशी हमी दिली. टंचाई परिस्थिती असली तरी जिल्ह्य़ातील शेतकरी यावर मात करुन पुढे जात असल्याकडे उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी लक्ष वेधले.
प्रास्ताविक करताना तांबे यांनी यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा पुरस्कार वितरण रद्द केले जाणार होते, मात्र काबाडकष्ट करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी समारंभपूर्वक वितरण करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
गोबर गॅससाठी नरेगातून अनुदान मिळावे, कृषीच्या राज्य सरकारच्या योजना जि. प.कडे हस्तांतरीत कराव्यात, ५ हजारऐवजी ३ हजार पशुधनामागे दवाखाना मंजूर करावा आदी मागण्या मांडताना त्यांनी पुढील वर्षी लोणी व श्रीगोंदे येथे पशु रोगनिदान प्रयोगशाळा व सर्व पशुदवाखाने ऑनलाईन जोडले जाणार असल्याची माहिती दिली. जिल्हा
पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंभारे यांनी आभार मानले. सभापती हर्षदा काकडे,
कैलास वाकचौरे, शाहूराव घुटे, सीईओ
रवींद्र पाटील तसेच सदस्य उपस्थित
होते.
ल्ल  पुरस्कार्थीचा तुतारी, ढोल-ताशांचा निनादात, फेटे बांधून सपत्नीक गौरव करण्यात आला. पत्नीलाही साडी भेट देण्यात आली.
ल्ल   पुरस्कार्थीमध्ये महिलांना ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची सूचना पदाधिकाऱ्यांकडून केली जात असताना अध्यक्ष लंघे यांनी ३५ टक्के वाटा देऊ, असे सांगितल्याने पदाधिकाऱ्यांतील विसंवाद उघड झाला.
ल्ल   समारंभास मोठी गर्दी होती, त्या तुलनेत जागा अपुरी होती.