स्त्रियांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता राज्यात स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात आली असून, याबाबत शासनाने जागे होऊन ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यावा म्हणून राज्यात ‘निर्भया समिती २०१३ गठीत करण्यात आली आहे. या समितीची शाखा सोलापुरात हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली आहे.
या निर्भया समितीमध्ये सोलापुरात विविध २९ संस्था व संघटनांच्या साहाय्याने महिलांच्या प्रश्नावर सहय़ांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आतापर्यंत ५० हजार सहय़ा गोळा करण्यात आल्या असून आणखी एक लाख सहय़ा गोळा करण्याचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेसाठी सोलापूर महापालिका महिला व बालविकास समितीच्या सभापती फिरदोस पटेल यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, प्रा. निशा भोसले व प्रा. ज्योती वाघमारे, भाजपच्या नगरसेविका प्रा. मोहिनी पत्की, श्रमिक महिला संघटनेच्या सरिता मोकाशी, रवींद्र मोकाशी, प्रमिला तूपलवंडे, सीमा किणीकर, रुकैयाबानो बिराजदार हे प्रयत्नशील आहेत.
राज्यस्तरावरील निर्भया समितीच्या निमंत्रक अ‍ॅड. वर्षां देशपांडे, डॉ. शशिकांत अहंकारी, शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, प्रतिभा देशपांडे आदींनी शासनाकडे विविध पाच मागण्या मांडल्या आहेत. यात राज्य महिला आयोगाचे रिक्त अध्यक्षपद तातडीने भरावे आणि महिला आयोग सक्रिय करावा, राज्याचे पुढील दहा वर्षांचे महिला धोरण जाहीर करावे, राज्य महिला सक्षमीकरण मिशन गठीत करावे. धर्माधिकारी समितीच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात, आरक्षणाबरोबर स्त्रियांना संरक्षण द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्यातून लाखो सहय़ांचे निवेदन मुख्यमंत्री व राज्यपालांना लवकरच सादर केले जाणार असल्याचे फिरदोस पटेल यांनी सांगितले.