News Flash

मोसम परिसरासाठी हरणबारी डावा कालवा प्रश्न जिव्हाळ्याचा

बागलाण तालुक्याच्या मोसम परिसरातील ६५ गावांची हरणबारी धरणाचा डावा कालवा काढण्याची व खरीप पिकांना पाणी देण्याच्या मागणीकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असून डाव्या कालव्याचा पूर्णत्वाचा

| January 30, 2013 12:40 pm

बागलाण तालुक्याच्या मोसम परिसरातील ६५ गावांची हरणबारी धरणाचा डावा कालवा काढण्याची व खरीप पिकांना पाणी देण्याच्या मागणीकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असून डाव्या कालव्याचा पूर्णत्वाचा प्रश्न लोंबकळत न ठेवता सातत्याने दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.
मोसम परिसरातील जनतेची मागणी लक्षात घेऊन १९६८-६९ मध्ये हरणबारी मध्यम प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. १९७१ नंतर प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले. १९७९-८० या वर्षी प्रकल्पात पाणी साठविण्यात आले. धरणाची क्षमता १२२८ दलघफू आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रातील ६५ गावांमध्ये सतत दुष्काळ असतो. यापैकी काही गावात पावसाळ्यातही टँकरव्दारे पाणी पुरवावे लागते. बागलाण तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पीक वाढीच्या काळात पावसाचे पाणी न मिळाल्याने ५० टक्के खरिपाचे पीक येत नाही. विहिरींच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. कधीकाळी या भागातून दोन ते तीन लाख टन ऊस गळीतासाठी जात असे. परंतु कमी पाण्यामुळे उसाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. बागलाण तालुक्यातील पाच हजार एकर डाळिंबाच्या क्षेत्रापैकी निम्मे या भागात आहे. पाण्याविना डाळिंबाचे क्षेत्र आता धोक्यात आले आहे.
या भागात सहा ते १५ इंचापर्यंत काळ्या मातीचा थर आहे. हरणबारी ते अंबासन या दरम्यान मोसम नदीवर व्दितीय श्रेणीचे बंधारे चारशे वर्षांपासून आहेत. प्रसिद्ध अभियंते सर विश्वेश्वरय्या यांनी या भागातील फड बागायतीचा गौरवशाली उल्लेख केला आहे.
ही फड बागायत कायमस्वरुपी जिवंत राहणे महत्वाचे आहे. हरणबारी शिवाय दुसरा प्रकल्प या भागात होणार नाही. त्यामुळे या भागातील खरीप पिके जगविण्यासाठी कालवे काढण्याची गरज आहे. अशा खरीप पीक पूरक कालव्यांव्दारे या भागातील तळवाडे लघु बंधारा, पाझर तलाव, नाला बंडींग भरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविता येईल. हरणबारी डावा कालवा ३३ किमी लांब आहे. या कालव्याचे सात किलोमीटरचे काम पूर्ण झाले तरी कालवा सिंचन खात्याकडे हस्तांतरीत होत नसल्यामुळे त्याची देखभाल होत नाही. या कालव्याच्या पुढील आठ ते १२ किलोमीटरच्या कामाची निविदा निघाली असून तुंगाडी नदीवरील पिंपळकोठे व भडाणे पाझर तलाव भरण्यासंदर्भात सिंचन खात्याने नियोजन करणे आवश्यक आहे. निविदा निघाली परंतु तीन वर्षांपासून भूसंपादन प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे कालव्याचे काम होत नाही ही वस्तुस्थिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 12:40 pm

Web Title: haranbari dava kalva solution is respectfull
Next Stories
1 नाशिक प्रकल्पीय आदिवासी उपयोजनेत ६५ कोटीने वाढ करण्याची मागणी
2 शिक्षक सेनेतर्फे २२ जणांचा ‘शिक्षण तपस्वी’ पुरस्काराने गौरव
3 संगणक सेवा अत्याधुनिक करण्याच्या सेवांचे सादरीकरण
Just Now!
X