डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जपानचे तोकूसिमा विद्यापीठ यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार झाला. याअंतर्गत दोन्ही विद्यापीठे संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार असून संशोधक विद्यार्थ्यांची आदान-प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात शुक्रवारी सकाळी संयुक्त बैठक झाली. कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, कुलसचिव डॉ. डी. आर. माने, पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ. महेंद्र सिरसाट तसेच तोकूसिमा विद्यापीठातील प्रा. री. इची. मुराकामी, प्रा. पंकज कोईणकर यांची उपस्थिती होती. विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक मोहेकर, वित्त व लेखाधिकारी डॉ. एस. टी. सांगळे, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा हेही उपस्थित होते.
करारांतर्गत संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक ज्ञानाचे आदानप्रदान, संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांची देवाण-घेवाण होणार आहे. दरवर्षी साधारणत: तीन विद्यार्थ्यांना तोकूसिमा विद्यापीठात संशोधनासाठी पाठविण्यात येईल. विज्ञान व तंत्रज्ञानातील ‘सेन्सर्स, फोटोव्होलटिक डिव्हाइसेस’ या विषयाचे संशोधन विद्यार्थ्यांना करता येईल. या करारामुळे जपानमधील नामांकित विद्यापीठात संशोधनाची संधी मिळत असल्याबद्दल डॉ. पांढरीपांडे यांनी समाधान व्यक्त केले, तर औरंगाबादचा ऐतिहासिक वारसा व आपल्या विद्यापीठातील पदार्थविज्ञान प्रयोगशाळांचा लाभ होत असल्याबद्दल प्रा. मुराकामी यांनी विद्यापीठाचे आभार मानले.