उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जैन इरिगेशन सिस्टीम यांच्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन व प्रशिक्षण यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून त्याअंतर्गत रसायन, भौतिक, रासायनिक तंत्रज्ञान, जैव आणि पर्यावरण या शास्त्रांशी निगडित संशोधन आणि विकास प्रकल्प राबविणे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, यासोबतच कौशल्य विकसनावर भर देणे ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.
विद्यार्थी, शिक्षण व संशोधन यांचा आदानप्रदान कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या करारांतर्गत प्रयोगशाळा उपलब्ध करून देणे, संयुक्तपणे मार्गदर्शन सेवा उपलब्ध करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पातंर्गत या दोन्ही संस्था एकत्रित काम करतील. विद्यार्थ्यांना नोकरी तसेच प्रशिक्षणासाठी या सामंजस्य कराराचा फायदा होणार आहे. जैन इरिगेशनचे प्लास्टिक पार्क, फुड पार्क आणि एनर्जी पार्क तसेच उपलब्ध संशोधन प्रयोगशाळा यांचा विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठातील अत्याधुनिक प्रयोगशाळांचा संशोधनासाठी फायदा होणार आहे. या करारामुळे अधिक चांगल्या प्रकारचे संशोधन विकास प्रकल्प भविष्यात राबविले जातील असा आशावाद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम, प्रा. डी. जी. हुंडीवाले, कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, डॉ. गौरी राणे आदी उपस्थित होते.