‘गांधी मला भेटला’ ही कविता १८ वर्षांपूर्वी ‘बुलेटिन’ नावाच्या अंकात प्रसिद्ध झाली. या कवितेमुळे बँक ऑफ महाराष्ट्रची प्रतिमा मलिन झाली असल्याचा साक्षात्कार बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना अलीकडे झाला. या कवितेच्या अनुषंगाने बँकेच्या प्रशासनाने ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज फेडरेशनचे सचिव देवीदास तुळजापूरकर यांच्यावर दोषारोप ठेवले. त्याच्या विरोधात एआयबीइए या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील २३ क्षेत्रीय कार्यालयांसमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले.
बँकेचे नवे कार्यकारी संचालक म्हणून नरेंद्र सिंग रुजू झाल्यानंतर बँकेच्या व्यवहारांमध्ये गुणात्मक वाढ व्हावी, या साठी या संघटनेमार्फत चर्चा करण्यासाठी वारंवार वेळ मागण्यात आली. दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्र व विजय मल्ल्या यांच्या कंपन्यांबरोबर झालेले व्यवहार यावरून बराच गदारोळ झाला. काही कंपन्यांकडून व्याजाची आकारणी न करणे आणि काही कंपन्यांना अवाजवी कर्ज देणे, या मुद्दय़ावरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. तो रिझव्र्ह बँकेकडे लेखी स्वरुपात मांडण्यात आला. असे करताना बँकेतील व्यवहाराची माहिती अचूकपणे देण्यात आली.
याच काळात एका इंग्रजी दैनिकातही या व्यवहाराच्या अनुषंगाने प्रश्नचिन्ह उभे केले गेले. या दैनिकाला माहिती पुरविल्याच्या संशयावरून तुळजापूरकर यांच्यावर कारवाई करता यावी, या साठी १८ वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या कवितेचा आधार घेण्यात आला. युनायटेड स्पिरिट व युनायटेड इंजिनिअरिंग या कंपन्यांवरून निर्माण झालेल्या वादाची कागदपत्रे व गैरव्यवहार चव्हाटय़ावर आणल्याचा राग आल्याने तुळजापूरकर यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आल्याचा दावा बँक एम्प्लॉइजच्या संघटनेने केला आहे.
जुलै-ऑक्टोबर १९९४मध्ये संघटनेच्या ‘बुलेटिन’ या नियतकालिकात ‘गांधी मला भेटला’ ही वसंत दत्तात्रय गुर्जर यांची कविता प्रकाशित करण्यात आली. ही कविता अश्लील आहे, असा दावा पुणे येथील पतित पावन संघटनेने केला. ही कविता प्रकाशित करणे योग्य की अयोग्य, त्यातील आशय श्लील की अश्लील यावर न्यायालयीन वादही सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात अजूनही हे प्रकरण प्रलंबित आहे. गुर्जरांची ही कविता वैचारिक परंपरेतील आहे. ती वाङ्मयीन रचना आहे. भाषेचे विविध प्रयोग त्यात केले आहेत. ‘गांधी मला भेटला’ ही कविता सामाजिक अस्वस्थतेची मूल्यात्मक नोंद आहे. त्यात अश्लील, बीभत्स, आक्षेपार्ह असे काही नाही, असा अभिप्राय रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी सरकारला कळविला होता. हा खटला सरकारने मागे घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली होती.
ही कविता १९९४ मध्ये प्रकाशित केल्यामुळे बँकेची व बँकेच्या कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलिन झाली, असा साक्षात्कार बँकेच्या अधिकाऱ्यांना झाला. त्यांनी ३ मे २०१३ रोजी तुळजापूरकर यांच्यावर दोषारोप दाखल केले. वास्तविक, तुळजापूरकर अनेक वर्षे बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळावर कार्यरत होते. बँकेच्या व्यवहाराचा व कविता प्रकाशित करण्याचा १८ वर्षांनी लावलेला संबंध अव्यवहार्य आणि जाणीवपूर्वक मुस्कटदाबी करणारा असल्याचे धरणे आंदोलनातील कार्यकर्त्यांनी आवर्जून सांगितले.