‘कोल्हापूर जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची हर्षवर्धन पाटील यांच्यावर नऊ वर्षांपासून जबाबदारी आली. त्यांनी ती भूमिका प्रामाणिकपणे पार पडली आहे,’ असे मत कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.
कोल्हापूर शहराचा थेट पाइपलाइनचा प्रश्न, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र, छत्रपती शाहूमहाराज जन्मस्थळ विकसित करणे, कोल्हापूर शहराची ड्रेनेजची व्यवस्था, प्रदूषणाचे प्रश्न, चित्रनगरी, शासकीय विश्रामगृहाशेजारी अद्ययावत इमारती, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंगणवाडी इमारती संपूर्ण बांधण्याचा निर्धार, शाळेतील विद्यार्थ्यांच्या बेंचची व्यवस्था करण्यासाठी निधीची तरतूद, तसेच या शाळांसाठी ई-लìनगसाठी भरीव निधी, प्रत्येक सर्कल सज्जा येथे पावसाची नोंद करण्यासाठी पर्जन्यमापक यंत्रासाठी निधी असे अनेक प्रश्न जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांच्यातर्फे मार्गी लागल्याचे मुश्रीफांनी प्रसिद्धीस दिले आहे.
टोलबाबात होणाऱ्या प्रश्नावर व आंदोलनाबाबत माझी, पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची नेहमी चर्चा होत असते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतके वातावरण प्रक्षुब्ध असताना आम्हास संवेदना नाहीत, आम्ही निगरगट्ट झालो असा अर्थ काढणे चुकीचे आहे. माझा व्यक्तिश: टोलला विरोध आहे. कोल्हापूर शहरातील लोकांना याचा फार मोठा त्रास होणार नाही, पण रोज ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना याचा मोठा भरुदड सहन करावा लागणार असल्याचेही मुश्रीफ यांनी या पत्रकात म्हटले आहे.
जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने राज्यात अग्रेसर करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगून विकासाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने सर्व प्रकल्प मार्गी लागतील, असा विश्वास असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.  २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व १ मे रोजी होणाऱ्या झेंडावंदनासाठी येणारा पालकमंत्री अशी होणारी टीका खोडून सातत्याने निमंत्रण येईल तेव्हा शासकीय तसेच कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहणारा पालकमंत्री, अशी आपली प्रतिमा त्यांनी कोल्हापूरच्या जनतेसमोर निर्माण केली आहे.