अतिक्रमण हटाव मोहिमेने शहरात पुन्हा वेग पकडला असून शनिवारी प्रामुख्याने चिकलठाणा परिसरात मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंना असलेली पक्क्य़ा स्वरूपाची अतिक्रमणे जेसीबीने पाडण्यात आली. या कारवाईत ८० घरांचे ओटे जेसीबीने हटविल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण मोहीम थंडावली होती. शनिवारी या मोहिमेला पुन्हा गती देण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान चिकलठाणा येथील चौधरी कॉलनी वसाहतीत मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंना असलेले घरांसमोरील ओटय़ाचे पक्क्य़ा स्वरूपाचे अतिक्रमण काढण्यात आली. स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे, नगरसेवक संजय चौधरी यांच्या उपस्थितीत व सिडको विभागाचे उपायुक्त बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. प्रशासकीय अधिकारी बी. के. गायकवाड, इमारत निरीक्षक पी. व्ही. गवळी, सारंग विधाते यांच्यासह मनपा अतिक्रमण हटाव पथकाचे सदस्य व पोलीस या वेळी हजर होते.
सिडकोत २०० गाळ्यांना सील
अतिक्रमण हटाव मोहिमेचा जोर सुरू असतानाच दुसरीकडे सिडकोच्या कॅनॉट मार्केट येथे २०० गाळ्यांना सील ठोकण्यात आले. मनपाच्या करवसुली पथकामार्फत अजंठा-एलोरा संकुलात ही कारवाई करण्यात आली. यातील १२० गाळेधारकांनी जागेवर थकीत कराचा भरणा केल्याची माहिती कर मूल्यांकन निर्धारक शिवाजी झनझन यांनी दिली.