स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनाचे लोण परभणी जिल्ह्यात पोहोचले. शुक्रवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी १५ ते २० उसाच्या वाहनांची हवा सोडून हेडलाईट व काचा फोडल्या. संघटनेच्या कार्यकर्त्यांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाला. संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन तुरे यांना अटक करण्यात आली.
खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या उसाच्या दराबाबत पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन करीत आहे. परभणीतही या आंदोलनाचे लोण पोहोचले. शुक्रवारी रात्री ब्राह्मणगाव, पोखर्णी, मानवत रस्ता, वसमत रस्ता, पेडगाव रस्ता, जिंतूर रस्ता, तसेच परभणी शहरातील उड्डाणपूल व जिल्हा परिषदेसमोर उसाच्या मालमोटारी, ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून देण्यात आली. कार्यकर्त्यांनी या वाहनांच्या समोरचे लाईट, तर काही वाहनांच्या काचा फोडल्या. रात्री उशिरा अचानक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाच्या वाहनांवर हल्लाबोल केला. या वेळी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा गाफील राहिली.
ब्राह्मणगाव येथे उसाच्या वाहन तोडफोडप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून गजानन तुरे यास अटक केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथे वाहनाची तोडफोड करून वाहनचालकास मारहाण केली व त्याच्याजवळील रोकड पळविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे तुरेसह इतर चार-पाच जणांवर दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला.
दरम्यान, अशा प्रकारे पोलिसांना हाताशी धरुन कार्यकर्त्यांवर दरोडय़ाचे गुन्हे दाखल करीत असतील तर साखर कारखानदारांना परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक कदम यांनी दिला. शुक्रवारी रात्री झालेल्या आंदोलनाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वीकारली नसून, काही अज्ञात लोकांनी उसाच्या मालमोटारीची हवा सोडली. परंतु पोलिसांनी यात संघटनेच्या कार्यकर्त्यांना गोवले, असा आरोप कदम यांनी केला.
तुरे यांना झालेल्या अटकेनंतर शनिवारी संघटनेची बठक झाली. बठकीत ऊस दरासह कापसाला प्रतिक्विंटल ८ हजार रुपये भाव द्यावा, या साठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. बठकीस माणिक कदम यांच्यासह दिगंबर पवार, बाळासाहेब कदम, शेख जाफर, शेख आयुब, केशव आरमळ, विजय पाटील सिताफळे, सोपानकाका बलसेकर आदी उपस्थित होते.