दोनो जहान तेरी मुहोब्बत में हार के
वो जा रहा है कोई शब-ए-गम गुजार के
संगीतकार मदन मोहन यांच्या अजरामर स्वरांनी सजलेली ही गजल शुक्रवारी मोजक्या रसिकांना ऐकायला मिळाली. तीही एरवी आपल्या नृत्याने सर्वानाचजिंकून घेणारे कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांच्या मखमली स्वरांचे कोंदण घेऊनच. तळपत्या उन्हाची पर्वा न करता दर्दी श्रोत्यांनी पं. बिरजू महाराजांच्या स्वरांनी रंगलेल्या या मैफलीचा आनंद लुटला.
निमित्त होते पं. बिरजू महाराज यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ कथक नृत्यांगना प्रभा मराठे यांच्या ‘कलाछाया’ संस्थेच्या ‘चितवन’ या साधना कक्षाच्या उद्घाटनाचे. या कक्षाचे उद्घाटन पं. बिरजू महाराज यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ चित्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते अमृतमहोत्सवानिमित्त पं. बिरजू महाराज यांचा सत्कार करण्यात आला. १९७६ मध्ये लखनौ येथे घेण्यात आलेल्या त्यांच्या छायाचित्रावर आधारित रेखाटलेल्या चित्राची प्रतिमा पंडितजींना प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ ध्रुपदगायक उस्ताद सईदुद्दीन डागर, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, प्रसिद्ध गायक सत्यशील देशपांडे, कथक नृत्यांगना शाश्वती सेन, मनीषा साठे, योगिनी गांधी, नंदकिशोर कपोते यांच्या उपस्थितीने जणू या कार्यक्रमाला दृष्य माध्यमातील कलाकारांच्या स्नेहमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले.
संस्थेच्या आवारामध्ये पं. बिरजू महाराज यांनी लावलेले कदंबाचे रोप आणि पं. भीमसेन जोशी यांनी लावलेल्या पांढऱ्या चाफ्याच्या रोपाचे आता वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. या दोन वृक्षांच्या छायेमध्येच चितवन हे साधना केंद्र साकारले जाणार असल्याचे प्रभा मराठे यांनी सांगितले. पं. बिरजू महाराज यांच्या स्वरातील ‘अर्धाग’ प्रभाताईंच्या शिष्यांनी साकारलेल्या नृत्यातून उलगडले. श्रीकांत पारगावकर यांनी ‘गुरु एक जगी त्राता’ ही गुरुवंदना सादर केली. ‘मैं ना मानूंगी तोरी बरजोरी मोरी पकडी कलाई’ ही ठुमरी पं. बिरजू महाराजांनी नजाकतीने सादर केली. त्यानंतर तिहाईचे बोल ऐकवित त्यांनी राधा आणि बासरी यांचे कृष्णाशी
नाते काव्यातून उलगडले, तर राजेश्वरी वैशंपायन यांनी सादर केलेल्या ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या रचनेने या छोटेखानी
मैफलीची सांगता झाली.