भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देण्यास पक्षातीलच पदाधिका-यांनी प्रखर विरोध केला आहे. गांधी सोडून पक्षाने अन्य पर्यायांचा गंभीरपणे विचार करावा, असे जाहीर आवाहन करत या पदाधिका-यांनी गांधी यांना आव्हान दिले आहे. गांधी यांनी पक्षसंघटना खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला, अर्बन बँकेत त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली, सामान्य कार्यकर्त्यांचा विचार न करता स्वत:चा राजकीय स्वार्थ साधणारे, असे विविध गंभीर आरोप या पदाधिका-यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहेत.
या पत्रकामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. पत्रकावर शहर जिल्हा सरचिटणीस अनिल शेवते, जिल्हा सरचिटणीस विनोद बोथरा, नामदेव राऊत, प्रकाश चित्ते व भानुदास बेरड, कार्यालयीन चिटणीस जगन्नाथ निंबाळकर, कोषाध्यक्ष सचिन पारखी, चिटणीस युवराज पोटे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे व जालिंदर वाकचौरे, शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, डॉ. मृत्युंजय गर्जे (पाथर्डी), बाबासाहेब महाडिक (श्रीगोंदे), नानासाहेब नागरे (राहुरी), मारुती सिंगले (श्रीरामपूर शहर), बबनराव मुठे (श्रीरामपूर तालुका) आदींच्या सहय़ा आहेत.
पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस श्याम जाजू यांनी कालच दिलीप गांधी यांच्या समर्थनासाठी नगरमध्ये मेळावा घेतला. नंतर लगेचच गांधी यांच्या संभाव्य उमेदवारीस प्रमुख पदाधिका-यांनी विरोध केला आहे, हे विशेष! जाजू यांनी काल संघटना मजबूत करणा-या व्यक्तीलाच लोकसभेचे तिकीट मिळेल, असे वक्तव्य काल केले, परंतु पक्षाने ठरवलेल्या निकषात गांधी कोठेच बसत नाहीत, गांधी सोडून अन्य पर्यायांचा विचार पक्षाने करावा पक्षहितासाठी ते आवश्यक आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पक्षसंघटना मजबूत होण्याऐवजी संघटनेत वेगवेगळे मतप्रवाह कसे राहतील याचीच दक्षता घेतली, आजपर्यंत झालेल्या कोणत्याच जिल्हाध्यक्षांशी त्यांचे कधीच पटले नाही, तुळशीराम मुळे, रविकाका बोरावके, चंद्रशेखर कदम, विठ्ठल लंघे, राम शिंदे, प्रताप ढाकणे ही बोलकी उदाहरणे आहेत. पदाधिका-यांत मनोभेद करणे, संघटनेवर अतिक्रमण करणे, समांतर संघटना तयार करणे, कूटनीतीच्या मार्गाने संघटना खिळखिळी करण्याचा प्रयत्न गांधी यांनी केला, असाही आरोप करण्यात आला आहे.
कोणत्याही कार्यकर्त्यांचा विचार न करता स्वत:च्या मुलाची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अट्टहासाने गांधी यांनी निवड करून घेतली, हे सत्तेचे केंद्रीकरण निश्चितच घातक आहे, अर्बन बँकेतील भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाल्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली, पक्ष इतरांपेक्षा वेगळा ओळखला जातो, हेच पक्षाचे बलस्थान आहे, कार्यकर्ते पक्षासाठी झटत असताना गांधी स्वत:चे हित जपतात. ते ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना जबाबदारीचे भान इतरांपेक्षा जास्तच असायला हवे, परंतु ते अजूनही भानावर आलेले नाहीत. एकेकाळी तत्त्वाचे राजकारण करणारा हा नेता तडजोडीचे राजकारण करण्यात आघाडीवर आहे. आजवर या गोष्टींचा आम्ही ऊहापोह केला नाही, परंतु कोणा एका व्यक्तीमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होऊ नये यासाठी हा खुलासा करणे आवश्यक वाटते व पक्षाचे वरिष्ठ नेतेही या सर्व गोष्टी विचारात घेऊन संघटनावाढीसाठी प्रयत्न करणा-या व्यक्तीलाच उमेदवारी देतील, अशी आशा या पदाधिका-यांनी व्यक्त केली आहे.