करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील अतिक्रमण समस्येची सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. पुरातत्त्वखाते व देवस्थान समितीचे म्हणणे आज ऐकून घेण्यात आले. आता या निकालाकडे भक्तगण व नागरिकांचे लक्ष वेधले आहे.    
करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर स्थापत्य शास्त्राचा अव्दितीय नमुना आहे. गेल्या काही दशकांमध्ये मंदिराचा परिसर व सभोवतालच्या भागात अतिक्रमणे लक्षणीय प्रमाणात वाढली आहेत. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे मंदिराच्या मूळच्या सौंदर्याला बाधा आली आहे. त्यामुळे मंदिरातील अतिक्रमणे हटवावीत यामागणीची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्याच्या सुनावणीचे काम सुरू होते.    
या अंतर्गत आज देवस्थान समिती व पुरातत्त्व खात्याच्या वतीने बाजू मांडण्यात आली. देवस्थान समितीचे अध्यक्षपद गेली काही महिने रिक्त आहे. सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपविण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीनी आज याविषयीची भूमिका स्पष्ट केली. तर पुरातत्त्व खात्याचे सहसंचालक कांबळे यांनी ऐतिहासिक संदर्भ देत आपले म्हणणे मांडले. या दोन महत्त्वाच्या विभागाची बाजू आता मांडून झाली असल्याने याप्रकरणी कोणता निकाल लागतो याकडे लक्ष वेधले आहे.