भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी अशोक सहकारी साखर कारखान्याने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी आता जायकवाडीच्या पाण्यासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांबरोबर एकत्रित दि.२१ रोजी होणार असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी दिली.
भंडारदरा धरणाचे तालुकानिहाय पाणी वाटप करण्यात आले आहे. ५२ टक्के पाणी तालुक्याच्या वाटय़ाला आले आहे. त्याच तत्वानुसार निळवंडेचे पाणी वाटप करावे, जायकवाडीसाठी भंडारदरा धरणातून एकाच वेळी पाणी सोडू नये, गरजेनुसार पाणी सोडावे, जायकवाडीच्या फुगवटय़ावरील उपसा योजनांचा बेकायदा पाणी उपसा थांबवावा, ओव्हरफ्लोचे पाणी तलाव व बंधाऱ्यासाठी वापरण्यास मिळावे आदी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.