जीवनशैलीतील बदलामुळे महिलांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचे हृदयविकारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. केवळ नोकरदार महिलाच नव्हे तर गृहिणींमध्येही हृदयविकाराचे प्रमाण ताणतणावामुळे वाढत असून सुमारे ६० टक्केम महिलांना हृदयविकाराचा धोका असल्याचे एका पाहणीत आढळून आल्याचे लीलावतीमधील विख्यात एन्डोक्रोनॉलॉजीस्ट डॉ. शशांक जोशी यांचे म्हणणे आहे.
नोकरदार महिला, त्यातही शहरी भागात काम करणाऱ्या महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच ताणतणावामुळे रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असले तरी गृहिणींमधील लठ्ठपणाचे प्रमाणही वाढत असल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. विशेषत: गुजराती व पंजाबी गृहिणींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त आहे. सुमारे ५१,७०० महिलांचे सर्वेक्षण केल्यानंतर ३५ ते ४४ वयोगटातील २५ टक्के महिलांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो, असे आढळून आले आहे. महिलांमध्ये पस्तीशीत हृदयविकाराचे प्रमाणे वाढण्यामागे ‘एचडीएल’ म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी असणे हे एक प्रमुख कारण आहे. हृदयविकारतज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या म्हणण्यानुसार जास्त वजन, मधुमेह व रक्तदाबामुळे कमी वयात हृदयविकार होतो. आहारविहाराच्या सवयींवर नियंत्रण तसेच रक्तदाब आणि मधुमेहाची नियमित तपासणी करून आटोक्यात ठेवल्यास हृदयविकार दूर ठेवता येऊ शकतो, असे डॉ. रत्नपारखी यांचे म्हणणे आहे.  आजार लपविण्याकडे किंवा त्रास मर्यादेपलीकडे जाऊन सहन करण्याच्या महिलांच्या स्वभावामुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचे आढळून येत असल्याचे डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले. अलीकडे तरुण मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले असून गर्भपाताच्या गोळ्या घेण्याच्या सवयीमधूनही हृदयविकाराचा त्रास वाढत असल्याचे शीव रुग्णालयातील हृदयविकारतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. अजय महाजन यांनी सांगितले. शीव रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये महिलांचे, त्यातही चाळीशीतील महिलांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढल्याचे डॉ. महाजन म्हणाले. आहारविहाराच्या सवयी, नियमित व्यायाम तसेच तंबाखू सेवनाला लांब ठेवल्यास हा आजार दूर ठेवता येऊ शकतो असेही डॉ. महाजन यांनी सांगितले.